जळगाव : कोतवालपदावरून जेठाणी आणि दिराणी यांच्यात जुंपल्याचा प्रकार समोर आला आहे. कोतवाल असलेल्या दिराणी यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी त्यांची जेठाणी यांनी रावेर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तहसीलदारांनी उपोषणस्थळी भेट देत; उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, तक्रार करूनही तहसीलदारांनी कारवाई केली नाही, असा आरोप करत जेठाणी यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रावेर तालुक्यातील खानापूर येथे कोतवाल असलेल्या दिराणी आशा कांतीलाल तायडे (वाघ) यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी खानापूर येथीलच त्यांची जेठाणी साधना संतोष महाजन-वाघ (माहेरचे नाव) यांनी रावेर तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
तहसीलदार बंडू कापसे यांनी उपोषणस्थळी भेट देत जात प्रमाणपत्राच्या तक्रारीसंबंधी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे ७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याने उपोषण स्थगित करण्याचे त्यांनी आवाहन केले. मात्र, तक्रार करूनही तहसीलदारांनी कारवाई केली नाही असा आरोप करत साधना महाजन यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आशा यांनी जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर न केल्याने तथा कागदपत्र बनावट असल्याने कोतवालपदाची नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी तक्रार ७ जून २०२४ रोजी साधना यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती.
काय आहे नेमका वाद ?
१ सप्टेबर २०२३ रोजी तहसीलदार यांनी खानापूर येथील कोतवालपदी आशा यांची नियुक्ती केली होती. या परीक्षेत साधना या द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. आशा यांचे माहेर इच्छापूर, जि. बऱ्हाणपूर (म. प्र.) येथील आहे. त्यांनी तालुक्यातील अहिरवाडी येथील रहिवासी असल्याचे कागदपत्र जोडून जुन्या नोंदी जोडल्या आणि बनावट जात प्रमाणपत्र काढले, असा आरोप साधना यांनी केला आहे.