संशयिताच्या दिशेने न्यायालयात दगडफेक, पोलिसांचा लाठीमार, पोलिसासह दोन जखमी

जळगाव : बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संजू बिस्मिल्ला पटेल या संशयिताला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कामकाजप्रसंगी एकवटलेल्या जमावाने संशयितावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हल्ला करणार्‍यांपैकी एकाला पकडून झोडपून काढल्याने पळून गेलेल्या तरुणांनी नंतर न्यायालयाच्या दिशेने दगडफेक करून संताप व्यक्त केला.

जळगाव शहरात दूध फेडरेशनमागील राजमालतीनगरातील संजू बिस्मिल्ला पटेल व त्याचा भाऊ राजू पटेल यांच्याविरुद्ध शहर पोलिसात अ‍ॅट्रॉसीटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. संजू पटेल याला पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयात संशयिताला आणत असल्याची माहिती झाल्यापासूनच न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर बौद्ध समाजबांधवांनी गर्दी करायला सुरवात केली होती.

न्यायालय परिसरात तणाव

कामकाजप्रसंगीच हल्ला होतो, की काय याची कल्पना आल्याने संबंधित पोलिसांनी संशयिताला सुरक्षित कैदी गार्डमध्ये बसवून ठेवत ‘कोणीही संशयिताला विचारल्याशिवाय बाहेर काढू नका’, अशा सूचना दिल्या होत्या. न्यायालयीन कामकाज होऊन दोन पोलिस संजू पटेल याला गाडीच्या दिशेने नेताना, चार-पाच तरुणांचा टोळक्याने धावत येत संशयिताला पोलीस गाडीतून ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने ते अयशस्वी झाले.
सौम्य लाठीमार

न्यायालयाच्या आवारात परिस्थिती चिघळत असल्याची जाणीव झाल्याने खबरदारी म्हणून रखीव पोलीस बलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. संशयित संजू पटेल याला पोलीस गाडीतून ओढून बाहेर काढत असताना, राखीव पोलिसांनी लाठीचार्ज केला. दोघा- तिघांना लाठ्या बसल्याने एक ताब्यात आला, तर इतर पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी लाठीमार केला, म्हणून न्यायालयाबाहेर असलेल्या जमावाने पोलिसांच्या दिशेनेच दगडफेक केल्याने एकच खळबळ उडाली.

संशयित संजू पटेल याला न्यायाधीश शरद पवार यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयितास 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.

न्यायालय आवारात संशयितावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न झाला. त्यात सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह अन्य एक कर्मचारी जखमी झाला, तर पोलिसांच्या लाठीमारात दोघे जखमी झाले.