Maharashtra Kesari 2025 : पंचाला जन्मठेप द्या; काका पवार संतापले, आखाड्यात राजकारणाचे डावपेच ?

Kaka pawar on Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं आणि असभ्य वर्तन करणं दोन पैलवानांना चांगलंच महागात पडलं आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेने  पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या तीन वर्षांत हे दोन्ही पैलवान कोणत्याही अधिकृत कुस्ती स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत.

काय झाला होता वाद?
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत पैलवान शिवराज राक्षे याने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत मैदानावरच पंचांना लाथ मारली आणि शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर कुस्ती संघटनांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तसेच, अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात मैदान सोडले आणि शिवीगाळ केली. पंचांशी हुज्जत घालण्याचा हा प्रकार अत्यंत अनुचित असल्याचे मत कुस्ती संघटनेने व्यक्त केले.

तीन वर्षांसाठी बंदीचा निर्णय
या प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत दोन्ही पैलवानांच्या वर्तनावर चर्चा झाली आणि तीन वर्षांसाठी निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, “कुस्ती हा एक शिस्तबद्ध आणि प्रतिष्ठेचा खेळ आहे. खेळात कठोर नियम असतात आणि त्यांचे पालन करणे प्रत्येक खेळाडूचे कर्तव्य आहे. पंचांवर हल्ला करणे, असभ्य वर्तन करणे हे कुस्तीच्या नैतिकतेला साजेसं नाही. त्यामुळे दोन्ही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला गेला.”

काय म्हणाले काका पवार ?
शिवराज राक्षे आणि महेंद्र यांच्यावर 3 वर्षे कुस्ती खेळण्याची बंदी घातली आहे. यावर बोलताना काका पवार म्हणाले की, महाराष्ट्र केसरी कोण होणार? हे स्पर्धेच्या आधीचं ठरलं जातं, असा गंभीर आरोप शिवराज राक्षे  आणि महेंद्र गायकवाडचे  वस्ताद अर्जुनवीर काका पवार यांनी केला. पंचालाही जन्मठेप द्या. तसेच मी शिवराजच्या चुकीचं समर्थन करणार नाही असंही काका पवार म्हणाले.