ईशान्य दिल्लीत मनोज तिवारी विरोधात कन्हैया कुमार

दिल्ली : काँग्रेसने आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यात कन्हैया कुमार यांच्या नावाचा समावेश आहे. काँग्रेसने त्यांना ईशान्य दिल्लीत भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या या खेळीमुळे बिहारी विरुद्ध बिहारी असा सामना पाहायला मिळणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून कन्हैया कुमार हे बिहारच्या राजकारणात सक्रिय होते. परंतु, काँग्रेसने त्यांना दिल्लीत ईशान्यमधून उमेदवारी दिली आहे. कन्हैया कुमार यांना दिल्ली ईशान्यमधून उतरवून काँग्रेसने मोठे खेळी केली आहे. ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ हा उत्तरप्रदेशला लागून आहे. येथे बिहार आणि हरियाणातील लोकांचा तुलनेने रहिवास अधिक आहे. यासोबत या मतदारसंघात पूर्वांचली मतदारांची संख्याही निर्णायक ठरणार आहे. यामुळे बिहारी विरुद्ध बिहारी अशी सरळ लढत होण्याचे चित्र तयार झाले आहे. दरम्यान, पुर्वांचल व बिहारी मतदारांमुळे मनोज तिवारी हे २०१४ आणि २०१९ मोठ्या फरकाने विजयी झाले होते. मात्र, यावेळी काँग्रेसने कन्हैया कुमारला रिंगणात उतरवून मनोज तिवारी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.