काश्मीरमधील ऐतिहासिक माता उमा भगवती मंदिर तब्बल ३४ वर्षानंतर भाविकांसाठी खुले

दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग येथील ऐतिहासिक माता उमा भगवती मंदिर रविवार, दि. १४ जुलै रोजी भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले. तब्बल ३४ वर्षांनंतर मंदिर पुन्हा उघडण्यात आले आहे. यावेळी झालेल्या सोहळ्यादरम्यान भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर मातेचे दर्शन घेतले.

अनंतनाग एकेकाळी दहशतवादाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. १९९० मध्ये दहशतवादामुळे स्थानिक हिंदूंच्या स्थलांतरामुळे माता उमा भगवती देवी मंदिरही बंद करण्यात आले होते. हिंसाचाराच्या काळात मंदिराला आग लावण्यात आली होती. भाविकांना राहण्यासाठी येथे दोन यात्री निवास होते. यामध्ये एकावेळी दीड हजार भाविक राहू शकत होते. हे यात्री निवासही दहशतीचे बळी ठरले, मंदिरात बसवलेल्या मातेच्या मूर्तीचीही मोडतोड झाली होती.

जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना मंदिराच्या सर्व भागांची डागडुजी करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मंत्रोच्चारात गाभाऱ्यात देवीची मूर्ती बसवण्यात आली. ही मूर्ती राजस्थानातून आणण्यात आली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.