खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग घेणार खासदारकीची शपथ;तर काश्मिरी फुटीरवादी नेता रशीदला सुद्धा २ तासांचा पॅरोल मंजूर

नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला लोकसभा खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. दि. ५ जुलै २०२४ रोजी तो लोकसभा खासदार म्हणून शपथ घेईल. अमृतपाल पंजाबमधील खांडूर साहिब येथून खासदार म्हणून निवडून आला आहे. अमृतपाल सिंगला पॅरोल मिळाल्याची माहिती खासदार सरबजीत सिंग खालसाने दिली आहे.

अमृतपालच्या शपथविधीबाबत आपण सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतल्याचे सरबजीत सिंग खालसाने सांगितले. स्पीकर ओम बिर्ला यांनी खालसाला माहिती दिली की अमृतपाल दि. ५ जुलै २०२४ रोजी दिल्लीत शपथ घेणार आहे. अमृतपाल सिंगला ४ दिवसांचा पॅरोल देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याच्या पॅरोलवर अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. सध्या अमृतपाल सिंग आसामच्या दिब्रुगड तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

दिब्रुगढहून अमृतपालला थेट हेलिकॉप्टरने दिल्लीत आणले जाईल, तिथे त्याला खासदारकीची शपथ दिली जाईल, अशी शक्यता आहे. पंजाब सरकारने अमृतपाल सिंगच्या पॅरोलबाबत सभापती ओम बिर्ला यांच्याकडे अर्ज पाठवला होता. अमृतसरच्या उपायुक्तांनी दिब्रुगड तुरुंग अधीक्षकांना अमृतपाल सिंगला पॅरोल मंजूर झाल्याची माहिती दिली आहे. अमृतपाल सिंग पंजाबमधील खांडूर साहिब येथून अपक्ष खासदार म्हणून निवडून आला आहे. त्याने तुरुंगातूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि निवडणूक जिंकली होती.

अमृतपाल सिंग यूएपीए प्रकरणात दिब्रुगढ तुरुंगात आहे, तो गेल्या वर्षभरापासून येथे बंद आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मोहालीत एका पोलीस ठाण्यावर हल्ला झाला होता, त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याच्यावर कारवाई केली होती. त्याच्या अनेक साथीदारांनाही अटक करण्यात आली. अमृतपाल सिंग पूर्वी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामधून खासदार निवडून आलेला फुटीरतावादी नेता इंजीनियर रशीद यालाही शपथ घेण्याची परवानगी देण्यात आली होती. इंजीनियर रशीद यांचाही दि. ५ जुलै २०२४ रोजी शपथविधी होणार आहे. न्यायालयाने त्याला दोन तासांचा पॅरोल दिला आहे.