जामीन मिळाला पण केजरीवाल तुरूंगातच ; हायकोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळे मोठा धक्का

नवी दिल्ली : दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने ईडीच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.

ईडीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दावा केला आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्याची पूर्ण संधी देण्यात आली नाही, त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाच्या जामीन निर्णयाला स्थगिती देण्यात यावी. उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतरच अरविंद केजरीवाल यांची आज सुटका होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत ट्रायल कोर्टाचा आदेश लागू केला जाणार नाही, असा आदेश दिला आहे. त्यामुळे केजरीवालांना मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात जाण्याबाबत टीका केली.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर करून दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी मोठा दिलासा दिला होता. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.