नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्ष आपला सहभाग नाकारत असताना, तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने दावा केला आहे की या प्रकरणात पक्ष तसेच अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, ईडीने म्हटले आहे की त्यांचे लक्ष आता ११०० कोटी रुपयांच्या गुन्ह्याच्या रकमेएवढी मालमत्ता जप्त करायची आहे. तपास यंत्रणेने आतापर्यंत २४४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
वृत्तपत्राला ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष आरोपी क्रमांक ३७ आणि ३८ संदर्भात आमचा तपास पूर्ण झाला आहे. न्यायालयाने आम्ही दाखल केलेल्या आठही आरोपपत्रांची दखल घेतली असून बहुतांश आरोपींना जामीन देण्यास नकार दिला आहे. “आम्ही आता गुन्ह्याची उर्वरित रक्कम शोधून ती जप्त करण्याच्या प्रक्रियेत आहोत.”
याच वृत्तानुसार, ईडीच्या आणखी एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ते आता या खटल्याची जलद गतीने सुनावणी करण्याचा प्रयत्न करतील, कारण ४० आरोपी, शेकडो साक्षीदार आणि हजारो पानांचे कागदोपत्री पुरावे आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात फक्त दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाच दारू घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार बनवण्यात आले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरील आरोपांना पुष्टी देण्यासाठी त्यांनी ओंगोले तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) खासदार मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी, त्यांचा मुलगा राघव मागुंटा आणि व्यापारी पी सरथ रेड्डी यांच्या जवाबाचा वापर केला. याशिवाय केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि पक्षाचे माजी मीडिया प्रभारी विजय नायर यांनी गोवा आणि पंजाबमधील निवडणूक निधीसाठी १०० कोटी रुपयांची कथित लाच मागितल्याचा दावा त्यांनी आरोपपत्रात केला आहे. यातून ४५ कोटी रुपयांचा थेट फायदा आम आदमी पक्षाला झाला.