तालुक्यातील नांद्रा (प्र. लो.) येथे २१ मे रोजी केशवस्मृती प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्यातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यातूनच ‘जलसंधारणा’तून करण्याचा प्रयत्न झाला. ‘मनसंधारण’ नांद्रा गावातील स्व. डब्ल्यू एस. पाटील यांच्या संकल्पनेतून जलसंधारणाचे काम नियोजित केलेले होते. एप्रिल महिन्यात प्रतिष्ठानतर्फे सुमारे २११ तास पोकलेन मशीनने ग्रामस्थांच्या डिझेल योगदानातून नाले खोलीकरण गाव व परिसरात करण्यात आले.
या कार्याची पाहणी करण्यासाठी व गावाला एक सदिच्छा भेट देण्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर, रोटरीचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी, जलनायक शिवाजीराव भोईटे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे संचालक राहुल पवार, रोटरीचे कॅप्टन मोहन कुलकर्णी, व्याख्याते गिरीश कुलकर्णी, जळके येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्पप्रमुख अनिल भोकरे, प्रकल्पाचे व्यवस्थापक आदित्य सावळे आलेले होते.
काही ठिकाणी जिवंत पाण्याचे स्रोत
सर्वप्रथम सकाळी परिसरातील खोलीकरणाची पाहणी करण्यात आली. यात काही ठिकाणी जिवंत पाण्याचे स्रोत लागल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. यानंतर गावातील संत गजानन महाराज मंदिरावर एक छोटासा संवादरुपी चर्चासत्र मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्यात केशवस्मृती प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद होऊन ग्रामविकासाच्या शिक्षण, आरोग्य, जलसंधारण यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
गावाचा एकोपा
याप्रसंगी गावातील बहुसंख्य शेतकरी गट. महिला बचत गट व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांचा याप्रसंगी असलेला उत्साह, स्वागताची अनोखी पद्धती, गावाचे सुसंस्कारित वातावरण व गावातील एकोपा पाहून सर्व मान्यवर भारावले. महिला बचत गटातर्फे रुपाली पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना महिला सक्षमीकरणासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याविषयी मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश खरे, सुनील पाटील, अविनाश वाघ, हरी पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व गावाच्या जलसंधारणाच्या कामाचा इतिहास गावाची सद्यःस्थिती हरीश पाटील यांनी मांडली. आभार प्रदर्शन दिवाकर पाटील यांनी केले.
यांनी दिले योगदान
खोलीकरणाच्या कामी गावातील नंदकिशोर पाटील, अमृतराज पाटील, नाना चोपडे, राजेश पाटील, गणेश पाटील, रघुनाथ अप्पा, डॉ. दीपक पाटील, नामदेव कोळी, हरीष पाटील या शेतकऱ्यांनी आर्थिक योगदान दिले. त्यांचे विशेष कौतुक सर्व मान्यवरांनी या वेळी केले. केशवस्मृती प्रतिष्ठानची विविध सामाजिक कामे सामाजिक बांधिलकी याबद्दल डॉ. भरत अमळकर यांनी सांगितले. तसेच शिक्षण, आरोग्य, शेतकरी व गावातील महिला बचत गट यांच्यासाठी मदतीस आम्ही तयार आहोत, असे डॉ. अमळकर यांनी मनोगतातून सांगितले.
जनता बँक निश्चितच आधार देणार
त्याचप्रमाणे रोटरीच्या माध्यमातून गावासाठी नक्कीच विधायक मदत करण्यात येईल, असे आश्वासन किशोर सूर्यवंशी यांनी दिले. पीक पद्धतीतील बदल, पशुसंवर्धन उद्योजकता विकास या विषयांवर अनिल भोकरे यांनी मार्गदर्शन केले. महिला उद्योजकांसाठी नवीन व्यासपीठ तयार व्हावे, अशी मागणी गावातील महिला बचत गटातर्फे यावेळेस करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना केशवस्मृतीने आगामी काळात गावातून अधिकाधिक उद्योजक तयार होण्यासाठी प्रतिष्ठान व जळगाव जनता सहकारी बँक निश्चितच आधार देईल, असे मान्यवरांनी सांगितले. गाव व परिसरातील सद्य पशुस्थिती, दूध उत्पादन क्षेत्रातील संधी याविषयी सहाय्यक पशुविकास अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.