अखेर खडसेराज संपले : दूध संघावर महाजन-शिंदे गटाचे वर्चस्व

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । जळगाव  जिल्हा दूध संघाची अटीतटीसह प्रतिष्ठेची समजली गेलेली जिल्हा दूध संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडली. दूध संघाच्या मतदानाची मतमोजणी निकाल रविवार सकाळी जाहीर झाला. यात शेतकरी पॅनलचे १५ तर प्रतिस्पर्धी सहकार पॅनलकृत खडसे गटाचे ५ उमेदवार विजयी झाले. एकूणच जिल्हा दूध संघावरील खडसे राज संपुष्टात येऊन महाजन शिंदे गटाच्या उमेदवारांनी सहकार पॅनलच्या उमेदवारांचा दारूण पराभव करीत विजय मिळविला.

जिल्हा दूध संघ संचालक मंडळाची २०२२-२०२७ ची सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची म्हटली गेली. या निवडणूकीत २० संचालकांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी जिल्ह्यातील १५ सर्वसाधारण गटातील पाचोरा मतदार संघात दिलीप ओंकार वाघ यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आले. तर अन्य सर्वसाधारण  गटासह महिला राखीव, इतर मागास वर्गीय, अनु.जाती जमाती, वि.जा.भ.ज गटातून सर्वात जास्त भाजपा महाजन गटाचे ९, शिंदे गटाचे ५ असे १४ तर प्रतिस्पर्धी सहकार गटाचे ५ असे २० उमेदवार विजयी झाले.
विजयी उमेदवारांत वि.जा.भ.ज.गटाचे अरविंंद देशमुख, अनु.जाती.गटातून संजय वामन सावकारे, महिला राखीव गटात पूनम पाटील, छाया देवकर, इमाव गटात पराग मोरे तर सर्वसाधारण गटातून गिरीश महाजन, मंगेश चव्हाण, गुलाबराव पाटील, संजय पवार, चिमणराव पाटील, अनिल भाईदास पाटील यांच्यासह आदी उमेदवार विजयी झाले.

पराभव दिसताच रोहीणी खडसेंसह इंदिरा पाटलांची मतमोजणी केंद्रातून एक्झीट
जिल्हा दूध संघाची मतमोजणीदरम्यान पहिल्या टप्प्यात महिला राखीव, अनु.जाती. इमाव, भ.जा.वि.ज आदी उमेदवार आणि त्यानंतर सर्वसाधारण गट या दोन टप्प्यात मतमोजणी केली गेली. दुसर्‍या टप्प्यातील मतमोजणी दरम्यान मुक्ताईनगर मधून मंदाकिनी खडसे यांचे  यांचे मताधिक्य कमी होत असून पराभव अटळ असल्याचे दिसून येताच ऍड.रोहीणी खडसे-खेवलकर यांनी तसेच चोपडा मतदार संघातून इंदिराबाई पाटील यांनीदेखील मतमोजणी कक्षातून काढता पाय घेतल्याचे दिसून आले.

यांचा झाला पराभव
पराभूत उमेदवारांमध्ये मंदाकिनी खडसे, डॉ.सतीश पाटील, स्मिता वाघ, शालीनी ढाके, ऍड. रविंद्र पाटील, डॉ.संजीव पाटील यांना पराभव पत्करावा लागला.