Kho-Kho World Cup 2025 : नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानावर प्रथमच खो-खो विश्वचषक स्पर्धा १३ ते १९ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत ३९ देशांचे संघ सहभागी होत असून, पुरुष आणि महिला दोन्ही गटांसाठी सामने आयोजित केले आहेत.
खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी पहिली वाहिली विश्वचषक स्पर्धा भारतात घेण्यात येत आहे. या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना १३ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. हा सामना रात्री ८.३० वाजता भारत विरुद्ध नेपाळ या संघात होईल.
खो – खो विश्वचषक स्पर्धेतील अंतिम साखळी सामने १६ जानेवारीस होतील. या साखळी सामन्यानंतर १७ जानेवारीपासून प्लेऑफ फेरी सुरू होणार आहे. पुरुषांची अंतिम लढत १९ जानेवारी रोजी रात्री ८.१५ वाजता होणार असून या लढतीने विश्वचषक स्पर्धेचा आकर्षक असा समारोप होईल.
विश्वचषकातील महिलांचा सलामीचा सामना १४ जानेवारीला होईल. हा सामना सकाळी ११.४५ वाजता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघात खेळविण्यात येईल. भारतीय महिला संघाचा पहिला सामना १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता दक्षिण कोरियाशी होईल. महिला गटाचेही साखळी सामने १६ जानेवारीस संपतील. १७ जानेवारीस प्लेऑफ लढती होईल. महिला अंतिम सामना १९ जानेवारीस संध्याकाळी ७ वाजता खेळविण्यात येईल.
ही स्पर्धा खो-खोला जागतिक क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे. खो-खो प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे.