जळगाव, 16 फेब्रुवारी : मुख्यमंत्री तथा गृहमंत्री जळगाव जिल्हा दौर्यावर येण्याच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर उमर्टी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले. तब्बल चार तासांनंतर महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
उमर्टी हे गाव महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर वसलेले असून, येथील काही भागात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रनिर्मिती होते. गावठी बंदुकांची तस्करी आणि शस्त्र विक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या गावात संशयितांचा शोध घेण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी गेले होते. मात्र, संशयिताला अटक करताच त्याच्या नातेवाइकांसह 12 ते 15 जणांनी पोलीस पथकावर अचानक हल्ला केला.
शस्त्र माफियांनी हवेत गोळीबार करत पोलिसांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही हवेत गोळीबार केला. या चकमकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैषराव नितनवरे आणि पोलीस शिपाई किरण पारधी जखमी झाले. मात्र, या गोंधळाचा फायदा घेत शस्त्र माफियांनी पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी यांचे अपहरण करून त्यांना मध्य प्रदेशच्या उमर्टी गावात बांधून ठेवले.
या घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने मध्य प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधला. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने मोठा फौजफाटा उमर्टी गावात पाठवण्यात आला. पोलिसांची मोठी कारवाई होण्याच्या भीतीने शस्त्र माफियांनी अपहरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली.
पोलीस दलावर गंभीर प्रश्नचिन्ह
चार तासांच्या धडक मोहिमेनंतर अपहृत पोलिसाला सुखरूप सोडवण्यात आले आणि संशयिताला अटक करण्यात आले. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण होणे आणि त्याला ओलिस ठेवण्याची घटना ही महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. जर पोलीस कर्मचारीच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, या हल्ल्यामागील मास्टरमाइंड आणि शस्त्र माफियांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.