वरुण राजा धो-धो बरसला : शेतशिवारात पाणीच पाणी, नाल्यांना पूर

अडावद ता.चोपडा :  अडावदसह परिसरात मध्यरात्री नंतर २ वाजेपासुन पहाटे ५ वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे. शेतशिवारातील बऱ्याचशा जमिनी पाण्याखाली आल्या आहेत. या पावसामुळे नाल्यांना पहिल्यांदाच पूर आला आहे. यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित 

यावर्षी मृगाच्या सरी वेळेवर कोसळल्याने शेतकऱ्यांची पेरणीची व मशागतीची कामे वेळेवर झालेली होती. अधून मधून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांची वाढही समाधानकारक होत आहे. मध्यंतरी सुरु असलेल्या रिपरिप पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कडक उन्हाळ्यामुळे भूजल पातळीही खाली गेल्याने शेतकरी राजा चिंतेत होता. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाची वाट बघत होता. म्हणून या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जि. प. शाळेत साचले पाणी 

पहाटे २ ते ५ दरम्यान झालेल्या पावसामुळे येथील जि.प. मराठी मुला-मुलींच्या शाळेत पाणीच पाणी साचल्याने जि.प.शाळेच्या प्रांगणाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे बरीच शेती पाण्याखाली आलेली आहेत. वरुणराजा धो-धो बरसल्यामुळे उकाड्याने त्रस्त सर्वसामान्य नागरिकांनाही काही अंशी दिलासा मिळाला आहे.