---Advertisement---
जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारींच्या घटनांमद्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशात बोदवड शहरातील मलकापूर रस्त्यावरील टेनिस कोर्टमध्ये काही मुले टेनिस खेळत असताना अल्पवयीन काही बालकांनी एका बालकावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
ही मुले खेळत असताना त्या ठिकाणी काही सात ते आठ अल्पवयीन मुले आले व त्यांनी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन ते तीन बालकाच्या हातात धारदार चाकू होता.
चाकू पाहून काही विद्यार्थी तेथून पळून गेले, तर पाचवीत शिकणारा ११ वर्षीय स्वरूप यशपाल बडगुजर याच्यावर इतर अल्पवयीन बालकांनी काहीही विचार न करता चाकूने वार केला.
त्यात तो रक्तबंबाळ झाला. यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. स्वरूपच्या सोबत असलेल्या काही बालकांनी त्याच्या घरी संपर्क करत माहिती दिली. त्याला रुग्णालयात आणले असून, उपचार सुरू आहे.
ही घटना कळताच सर्व पालक बोदवड पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिस निरीक्षक अरविंद भोळे यांना ही माहिती मिळताच ते अल्पवयीन बालकांच्या शोधासाठी रवाना झाले.
रविवारी ही घटना घडली, संध्याकाळी उशिरापर्यंत बोदवड पोलिस ठाण्यात पालकांचा जमाव गुन्हा नोंद करण्यासाठी थांबून होता. गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या अल्पवयीन बालकांनी बाजारपेठेमध्येही दहशत माजवली असून, पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.









