World FIDE Championship 2024 : कोनेरू हम्पीने दुसऱ्यांदा पटकावले जागतिक जलद बुद्धिबळाचे जेतेपद

#image_title

World FIDE Championship 2024 : भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिने रविवारी (दि.29) इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हम्पीने यापूर्वी 2019 मध्ये जॉर्जियामध्येही ही स्पर्धा जिंकली होती. या ऐतिहासिक विजयासह, हम्पी भारतातील दुसऱ्या महिला बुद्धिबळपटू ठरल्या आहेत.

37 वर्षीय हम्पीने 11 पैकी 8.5 गुणांसह स्पर्धा पूर्ण केली. हा विजय तिच्यासाठी निर्णायक ठरला होता, कारण चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी तिला फक्त विजयाची आवश्यकता होती. ड्रॉ किंवा पराभवाने तिचे स्वप्न भंगले असते. रशियाच्या 18 वर्षीय वोलोदार मुर्झिनने पुरुष गटात विजेतेपद मिळवले, आणि त्याच्या वयाच्या 17 व्या वर्षी नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह नंतर तो दुसरा सर्वात तरुण FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन ठरला.

हम्पीच्या या विजयाने भारतीय बुद्धिबळासाठी 2024 चा शेवट उत्कृष्ट केला आहे. अलीकडेच सिंगापूर येथे झालेल्या शास्त्रीय बुद्धिबळ जागतिक स्पर्धेत, डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून चॅम्पियनपद जिंकले होते. हंपीने नेहमीच वेगवान बुद्धिबळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, आणि 2012 मध्ये मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

2019 मध्ये जॉर्जियामध्ये बटुमी येथे चॅम्पियनशिप जिंकून तिने यशाच्या शिखरावर पोहोचले होते, आणि नंतर 2023 मध्ये समरकंद, उझबेकिस्तानमध्ये रौप्य पदक जिंकले होते. त्याच वर्षी, रशियाच्या अनास्तासिया बोडनारुकविरुद्ध तिला टायब्रेकमध्ये विजेतेपद हुकले होते.

वैयक्तिक कारणांमुळे हंपी 2024 च्या बुडापेस्ट ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होऊ शकली नाही, जिथे भारताने सहा सुवर्णपदके जिंकली. त्यात वैयक्तिक आणि संघ स्पर्धेतील सुवर्णपदकांचा समावेश होता. पण, हंपीने 2024 च्या शेवटी जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद जिंकून आपल्या कारकिर्दीचे एक नविन आणि दमदार पुनरागमन केले आहे.