कुंभ केवळ धार्मिक नसून हिंदू धर्म व देश रक्षणासाठी – प.पू.बाबूसिंग महाराज

जामनेर : कुंभाचा कार्यक्रम हा फक्त धार्मिक नसून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व देशासाठी असल्याचे प्रतिपादन प.पू.बाबूसिंग महाराज (पोहरागड) यांनी केले.

अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लबाना – नायकडा समाज कुंभ 25 ते 30 जानेवारी दरम्यान, गोद्री येथे होत आहे. त्यानिमित्ताने ८ रोजी दुपारी १ वाजता ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख साधू संतांच्या हस्ते भगवा ध्वज आणि पांढऱ्या ध्वजाचे पूजन करून ध्वज उभारण्यात आला. याप्रसंगी संत गोपाल चैतन्यजी बाबा, संत सुरेश बाबा, संत रामसिंगजी महाराज, संत यशवंतजी महाराज, महंत जितेंद्र महाराज, संत रायसिंगजी महाराज, संत शामचैतन्यजी महाराज, महामंडलेशवर जनार्धन हरी महाराज, प.पू . हिम्मतजी महाराज, वे.शा. स. साहेबरावजी शास्त्री, प.पू. विशुद्धानंदजी महाराज, संत सर्वचैतन्य महाराज, प.पू. दिव्य चैतन्य महाराज, प.पू शांती चैतन्य महाराज, अ. भा. धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, क्रीडा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीष महाजन उपस्थित होते .

यावेळी संत जितेंद्र महाराज यांनी आपल्या मनोगतात वर्तमान स्थितीत मोठ्या प्रमाणात धर्माची हानी होत आहे असे सांगून धर्म रक्षणासाठी हा कार्यक्रम असून लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
संत कबिरदास महाराज यांनी आपल्या प्रतिपादनात देशाला जागृत करण्याचे काम गोरबंजारा समाजाने केले असल्याचे सांगितले. संत गोपाल चैतन्य महाराज यांनी आपल्या मनोगतात देश कमजोर होऊ नये यासाठी धर्म परिवर्तन होऊ नये. म्हणून संत व संघाच्या धर्मजागरण विभागाने कुंभ आयोजित केला आहे. भारतात जन्मलेले सर्व हिंदू असून समस्त हिंदू समाजाचा हा कुंभ असल्याचे प्रतिपादन केले.

महामंडलेशवर जनार्धन हरी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात बंजारा समाज व हिंदू समाज संघटित होईल, आम्ही विभाजित झालो आहोत, कुंभाच्या माध्यमातून एकत्र होऊ असे सांगितले. तर संत बाबूसिंग महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात कुंभ साठी हिंदू धर्माचे साधू संत येत आहेत. कुंभाच्या यशस्वीतेसाठी देशभरातून स्वयंसेवक कार्य करत आहेत. हा कार्यक्रम फक्त धार्मिक नसून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व देशासाठी असल्याचे सांगितले. शरदराव ढोले यांनी समारोपीय भाषणात ” जहाँ हिंदू घटा वहा भु भाग फटा” धर्माचे रक्षण कराल तर देशाचे रक्षण होईल , आपल्या विविध जाती जमातीमधून हिंदुत्व निघून गेले, तर देश निघून जाईल असे सांगितले. आपल्या राष्ट्राचा आधार हिंदुत्व आहे आणि त्याचा जागर आपल्याला वेळोवेळी करावा लागणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार गिरजे यांनी केले.

===========