धुळे : शिंदखेडा तालुक्यातील मौजे चौरंगाव येथे आज सोमवार, १५ रोजी ग्रामसेविका राजबाई पाटील यांना धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्विकारतांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी ग्रामपंचायत चौगांव बु. येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम घेवुन ते काम पुर्ण केले आहे. या कामावर झालेल्या खर्चाचे बिल तक्रारदार यांना अदा करण्यात आले होते. तसेच तक्रारदार यांनी मौजे चौगांव बु. येथे रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरणाचे काम केले आहे. या कामाकरीता झालेल्या खर्चाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते म्हणुन तक्रारदार यांनी सुमारे १ महिन्यापुर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केलेल्या रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली असता ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे रस्ता कॉक्रीटीकरणावर झालेल्या खर्चाचे बिल काढण्याकरीता तसेच तक्रारदार यांनी यापुर्वी केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे बिल काढून दिल्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदार यांनी धुळे लाच प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने सोमवार १५ रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचेकडुन १५,हजार रुपयांची लाचेची रक्कम त्यांचे शिंदखेडा येथील राहते घरी स्वतः स्विकारतांना ग्रामसेविका राजबाई पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुध्द शिंदखेडा पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर, मपोकॉ. दिपाली सोनवणे या पथकाने केली आहे.