Ladki Bahin Yojana : गुड न्यूज ! डिसेंबर महिन्याचा हप्ता या आठवड्यात होणार वितरित

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना लाभार्थींना डिसेंबर महिन्याचा हप्ता या आठवड्यात वितरित होणार असल्याची समोर आली आहे. पहिल्या टप्प्यात ३५ लाख महिलांना हफ्ता जमा करण्यात येणार असून, उर्वरित महिलांना दुसऱ्या टप्प्यात लाभ दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हफ्ता लवकरच मिळेल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आजपासून प्रक्रिया सुरू झाली असून, डिसेंबर अखेरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे सांगण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेची घोषणा व अंमलबजावणी हे निवडणुकीपूर्वी महायुतीचे एक महत्त्वाचे पाऊल ठरले. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळाला, तसेच समाजात सरकारच्या सकारात्मक प्रतिमेला बळ मिळाले.

जुलैपासून दर महिन्याला 1500 रुपये देण्यात आले, ज्यामुळे महिलांना थेट लाभ मिळू लागला. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिन्यांचे पैसे एकत्रित देऊन सरकारने महिलांच्या अपेक्षांची पूर्तता केली.

महायुतीला निवडणुकीत मोठे यश 

लाडकी बहीण योजनेने महायुतीच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. निवडणुकीत महायुतीला मिळालेले प्रचंड बहुमत, भाजपला मिळालेल्या 132 जागा, शिवसेनेच्या 57 जागा, आणि राष्ट्रवादीच्या 41 जागा हे योजनेच्या प्रभावाचे स्पष्ट उदाहरण आहे.

महायुतीने निवडणूक प्रचारादरम्यान महिलांना योजनेतील रकमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. डिसेंबरपासून महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय होणार की 1500 रुपयेच सुरू राहणार, याबाबत स्पष्टता लवकरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.