जळगावात पुन्हा लाखोंची कॅश सापडली

#image_title

जळगाव । जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका दुचाकीस्वाराकडून तब्बल १५ लाखांची रोकड जप्त केली आहे. या पैशांबाबत दुचाकीस्वार समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे पोलिसांनी हे पैसे जप्त करत कारवाई केली. सध्या या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावसह राज्यात ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. याच दरम्यान, शहरातील पांडे चौकाकडून एक बुलेटस्वार (एमएच १९, सीए ६०३१) आकाशवाणीकडे पैसे घेऊन जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. सायंकाळी पोलिसांच्या पथकाने इच्छादेवी चौकातच बुलेटस्वाराला अडवून त्याच्या डिक्कीची झाडाझडती घेतली. डिक्की उघडताच त्यात तब्बल १४ लाख ८० हजार ४०० रुपयांची रोकड मिळून आली.

या रोकडसंबंधी दुचाकीस्वार डी. के पाटील यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली असता ते व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाहीत. दरम्यान पाटील यांनी हे पैसे आपल्या शेतीशी संबंधित असल्याचे सांगितले. पैशांबाबत दुचाकीस्वार समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे पोलिसांनी हे पैसे जप्त करत कारवाई केली.