लालू यादवांच्या जामीन प्रक्रियेला आव्हान, वाचा सविस्तर

नवी दिल्ली: सीबीआय अर्थात केंद्रीय तपास संस्थेने चारा घोटाळ्यातील आरोपी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या जामीन प्रक्रियेला आव्हान दिले आहे. यात सीबीआयच्या याचिकेवर 25 ऑगस्टला सुनावणी होणार असल्याने लालूंसमोर पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या आहेत.

चारा घोटाळासंबंधित कमीत कमी चार प्रकरणांत सीबीआयने  लालू यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. परंतु, सीबीआयने या संदर्भातील सर्व आदेशांवर आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर आता 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

या आधी मागील मार्चमध्ये झारखंडमधील डोरंडा कोषागार प्रकरणात न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने लालू प्रसाद यादवांच्या जामीनाला आव्हान देणार्‍या सीबीआय याचिकेवर नोटिस जारी करण्यास नकार दिला होता.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू आणि वकील रजत नायर यांनी सदर प्रकरणात नोटीस जारी करण्याची मागणी केली होती. परंतु, या प्रकरणात एकत्र सुनावणी करण्यात येणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले होते. दरम्यान, सीबीआयने आपल्या याचिकेत लालू यादवांना जामीन देण्यास झारखंड उच्च न्यायालयाच्या 22 एप्रिल 2022 रोजीच्या आदेशाला आव्हान दिले होते. 74 वर्षीय लालू यादव चारा घोटाळ्यात विविध प्रकरणांत दोषी आढळल्यानंतर प्रकृतीमुळे सध्या जामिनावर आहेत.