संजय राऊत ते सुषमा अंधारे या प्रवासात बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेला अंधारात नेऊन ठेवण्याची प्रक्रिया कधी पार पडली, ते खुद्द उद्धव ठाकरेंनाही कळले नाही. आपले नालायकपण मान्य करायचे नसले की, दुसर्याच्या लायकपणावरही चिखलफेक करता येते. संजय राऊत, ‘सामना’ आणि उबाठा शिवसेना यांचेही आता असेच काही झाले आहे.एकमेकांना सांभाळण्याइतकेच घरगुती लोक ज्यांच्याकडे शिल्लक राहिले आहेत,
अशी माणसे आता ‘फडणवीसांना सांभाळा’ असा सल्ला देत आहेत. मागे विधिमंडळातील सदस्यांबाबत अपशब्द वापरल्यानंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळातून राज्यसभेत राऊतांच्या विरोधात ठराव गेला. या वाचाळवीरपणामुळे राज्यसभेतूनही आता एक जागा कमी होण्याची वेळ आली आहे. टीव्हीवरून जी काही बेताल बडबड चालू असते, तीही आता बंद होण्याची वेळ आली आहे.
राऊतांचा सकाळी 9 वाजताचा भोंगा आता बंद झाला आहे. त्यांच्या बेताल बरळण्याला महाराष्ट्रातले टीव्ही चॅनलही कंटाळले. त्यामुळे आता ‘सामना’च्या माध्यमातून त्यांनी हे लाथा झाडण्याचे काम सुरू केले आहे. फडणवीस आज उपमुख्यमंत्री असले, तरीही त्यांचे भविष्य काय आहे, याबाबत सगळ्यांना पुरेपूर कल्पना आहे. मात्र, संजय राऊत व उद्धव ठाकरे यांचे भविष्य काय, याबाबत कोणीही काहीही सांगू शकत नाही.
सोशल मीडियाच्या काळात भावनेच्या गांजा गोळ्या देऊन सच्च्या शिवसैनिकांना फसविण्याचे दिवसही संपले आहे. पूर्वी शिवसेनेत फक्त पक्षप्रमुखांची मुलाखत व्हायची, आता ती संजय राऊतांचीसुद्धा होते. आपल्याला बाळासाहेबांमुळे जग ओळखते, असे सांगायला सुरुवात केल्यानंतर लगेचच राहुल गांधींच्या मुखदर्शनासाठी चाललेली संजय राऊतांची लाचार केविलवाणी धडपड दिसायला लागते.26 गळेपडूपणा आता काँग्रेसच्या कोट्यातून का होईना. राज्यसभा पुन्हा मिळविण्यासाठी चालू आहे. घराणेशाहीचे एक ठरलेले असते, क्रमांक एकवर सदैव घराण्यातले लोकच विराजमान होतात. भले त्यांची कुवत काहीही असो. मग स्पर्धा सुरू होते, ती क्रमांक दोनच्या जागेसाठी. आता क्रमांक दोनच्या स्पर्धेसाठी शर्यत म्हटल्यावर ज्या कुवतीची माणसे, अशा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात; ती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षात सहभागी झाली आणि त्यांनी पक्षाची वाताहत केली. अजूनही ती सुरूच आहे
ज्याची साथ सोडल्यानंतर तुमची विनाशाकडे वाटचाल गतिमान झाली, त्याच माणसांवर आज तुम्ही झोकांड्या मारत असल्याचे आरोप करीत आहात. ‘उप’ काय आणि ‘मुख्य’ काय? लोकशाहीत ज्याने जबाबदारी घेतली, त्याला ती पाळावी लागते. फडणवीस ती पाळण्यासाठी सक्षम आहेत. परत आल्याबरोबर त्यांनी विधायक कामे झपाट्याने सुरू केली. मेट्रो गतिमान केली. ‘समृद्धी महामार्ग’ पूर्णत्वाकडे नेला.