Jalgaon News । रब्बीची चिंता मिटली; भोकरबारी वगळता अंजनीसह सर्वच प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

जळगाव : गेल्या महिना दीड महिन्यात शहरास जिल्ह्यात भोकरबारी वगळता ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणारे लहान मोठे प्रकल्प एका पाठोपाठ पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्ग केला जात आहे. एरंडोल तालुक्यातील पळासदड येथील अंजनी मध्यम प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला असून रविवारी सकाळी प्रकल्पाचे दोन गेट उघडून विसर्ग केला जात असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे प्रकल्प प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात गिरणा, हतनूर आणि वाघूर असे तीन मोठे तसेच १४ मध्यम आणि ९६ लघू असे प्रकल्प आहेत. यात गिरणा, हतनूर आणि वाघूर तसेच अभोरा, मंगरूळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, बोरी आणि मन्याड आदी प्रकल्प सप्टेंबर दरम्यान टप्प्याटप्याने पूर्ण भरल्याने विसर्ग केला जात आहे.

अंजनी प्रकल्पातून विसर्ग
रविवार सकाळी अंजनी प्रकल्प १०० टक्के भरला असून प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून अंजनी नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. अंजनी प्रकल्पातून एरंडोल शहरासह कासोदा व परिसरातील आठ गावांना पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी मान्सूनदरम्यान गिरणा प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी कालव्याव्दारे अंजनी प्रकल्प ५०। टक्क्यांपेक्षा अधिक भरण्यात आले. त्यानंतर मात्र अंजनी नदीच्या उगमस्थळ आणि प्रकल्प पाणलोट परिसरात चांगला पाऊस होत आहे. ज्यामुळे या प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली असून जलसाठ्यात झपाट्‌याने वाढ झाली असून रविवारी सकाळी प्रकल्पाचे दोन गेट उघडून विसर्ग केला जात आहे.

भोकरबारी आणि बहुळा वगळता सर्वच प्रकल्प ओसंडले
जिल्ह्यात गिरणा, वाघूर १०० टक्के तर हतनूर आदी मोठ्या प्रकल्पात ९३.७५ टक्के, तर मोर, अभोरा, मंगरूळ, सुकी, बोरी, तोंडापूर, अग्नावती, हिवरा, अंजनी, मन्याड आदी प्रकल्प १०० टक्के भरले असून या प्रकल्पातून विसर्ग केला जात आहे. तर पाचोरा तालुक्यातील बहुळा प्रकल्पात ८१.७३ आणि भोकरबारी ७.२७ टक्के असा एकूण ८९.४५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर गेल्या वर्षी याच दिवशी केवळ ५९.६९ टक्के उपयुक्त जलसाठा होता असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

रब्बीसाठी होणार फायदा
अंजनी प्रकल्पातील जलसाठा शंभर टक्के झाला असून रब्बी हंगाम ात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी या प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या आवर्तनाचा फायदा होणार आहे. सुम ारे आठशे हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळत असून याशिवाय धरणगाव शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास अंजनी नदीपात्रातून पाणी सोडण्यात येते. अंजनी प्रकल्पासह पद्मालय, भालगाव व खडकेसीम येथील तलावांमध्ये देखील जलसाठा झाल्यामुळे यावर्षी रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.

गाळ उपसामुळे प्रकल्पाची खोली वाढून पाणीपातळीत वाढ
मान्सूनपूर्वी अंजनी प्रकल्पात जलसाठा संपुष्टात आल्यामुळे प्रकल्पातून हजारो ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला आहे. ज्यामुळे प्रकल्पाची खोली वाढण्यास मदत झाली आहे. अंजनी प्रकल्पाची पाण्याची पातळी २२५.९० मीटर झाली असून एकूण जलसाठा १९.२५३ दश लक्ष घनमीटर आहे. यातील उपयुक्त जलसाठा १५.४८१ दश लक्ष घनमीटर असून रविवार सकाळी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून अंजनी नदीपात्रात विसर्ग केला जात आहे.
– देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा प्रकल्प पाटबंधारे विभाग जळगाव.