Weather Update : महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरणार; जळगावात ‘या’ तारखेपासून परतणार थंडी

जळगाव । बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे जळगावसह राज्यात थंडी गायब झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे काही भागात ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.  तर, आता पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या आठवड्यात नागरिकांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला. मात्र फेंगल चक्रीवादळामुळे जळगावसह राज्यात थंडी गायब झाल्याचं चित्र आहे. असे असले तरी एकाच दिवसात जळगावचे किमान तापमान ४ अंशाने घसरले होते. या आठवड्यात जळगावकरांना थंडी ऐवजी गर्मीचा सामना करावा लागला. मंगळवारी १८. ८ अंशावर असलेला पारा बुधवारी १४. ८ वर नोंदवला तर कमाल तापमानातही वाढ दिसून आली.

मंगळवारी ३०.८ अंश असलेले कमाल तापमान बुधवारी ३२.२ वर पोहोचले होते. यामुळे बुधवारी दुपारी काहीसा चटका जाणवला. तर, आता पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हयात पुढील तीन दिवस अंशतः ढगाळ असेल. यामुळे कमाल, किमान तापमानात चांगलीच वाढ झालेली दिसेल. मात्र, ९ डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढणार आहे. या तारखेपासून किमान तापमान १२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात आली आहे.

गुरुवारी जळगाव शहरात कमाल तापमान ३३ तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. आगामी तीन दिवस किमान तापमान १४ ते १६ तर कमाल तापमान ३२ ते ३४ दरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र, ९ डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी शहरात सायंकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान आकाशात ढग, आकाशही अंधारून आले होते. मात्र, सहा वाजेनंतर पुन्हा आकाश निरभ्र झाल्याचे चित्र प्रकर्षाने समोर आले होते.