‘टीआरपीच्या नादात पडू नको..’ खासदार पप्पू यादवला लॉरेन्स गँगची धमकी

#image_title

बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या धमक्या 3 जणांनी दिल्या आहेत, त्यापैकी एकाने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगितले आहे. दुसरा धमकीचा फोन दुबईतून आला आहे. त्याचवेळी मयंक सिंग नावाच्या तिसऱ्या व्यक्तीने फेसबुक पेजच्या माध्यमातून खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

मयंक हा झारखंडमधील कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य आहे. त्याचबरोबर या प्रकरणी पप्पू यादवने गृहमंत्रालयाला पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. याशिवाय बिहारचे डीजीपी आणि पूर्णिया रेंजच्या डीआयजींनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्जू लॉरेन्स नावाच्या व्यक्तीने आधी लॉरेन्स बिश्नोईचा फोटो पप्पू यादवला व्हॉट्सॲपवर पाठवला, त्यानंतर 9 कॉल केले. पप्पू यादवने फोन उचलला नाही तेव्हा व्हॉईस मेसेज पाठवले गेले आणि तो पाटणा, दिल्ली किंवा पूर्णिया कुठेही असला तरी त्याला आपला जीव गमवावा लागेल, अशी धमकी देण्यात आली.

‘टीआरपी मिळवण्याच्या फंदात पडू नका…’
त्याचवेळी मयंकने सोशल मीडियावर पप्पू यादवबद्दल धमकी देणारी पोस्ट केली होती. पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोईबद्दल चुकीचे विधान केल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे पप्पू यादव यांनी त्यांच्या मर्यादेत राहून शांततेने राजकारण करावं, टीआरपी च्या नादात उगाच आमच्या भानगडीत पडू नये. आमच्या नादाला लागल्यास जीवाशी जावं लागेल. असं या पोस्ट मध्ये लिहल आहे.

गृहमंत्र्यांना लिहिले पत्र
पप्पू यादवने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. लॉरेन्स गँगने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. त्यामुळे सरकारने त्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी होत आहे. त्याला यापूर्वीही अनेकदा इतरांकडून धमक्या आल्या होत्या.