हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. नवाब मलिकांवर आरोप करणाऱ्या भाजपला (BJP) आता मलिक कसे चालतात? असा सवाल करत सभागृहात ठिणगी पडली. आज हीच ठिणगी वणव्याचं रुप घेण्याची शक्यता आहे. सभागृहात नवाब मलिकांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. मलिकांना भाजपात सामील करुन न घेण्याची विनंती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खुलं पत्र जारी करत अजितदादांना (NCP Ajit Pawar) केली आहे. पण या ओपन लेटरवरुन सध्या अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
दुसरीकडे मराठा आरक्षण (Maratha Reservation), अवकाळीमुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरु शकतात.
नवाब मलिकांवरुन आरोप
फडणवीसांचा लेटर बॉम्ब
अधिवेशनाचा पहिला दिवस कामकाजापेक्षा गाजला तो एका नेत्यामुळे. आणि तो नेता म्हणजे नवाब मलिक. ऑगस्टमध्ये जामीन मिळाल्यापासून ते कारागृहाबाहेर आहेत. मात्र, राष्ट्रवादीतल्या उलथापालथीनंतर त्यांची भूमिका काय? हे अजून गुलदस्स्त्यात होतं. आणि काल अचानक मलिक हिवाळी अधिवेशनात हजर झाले. इतकंच नाही तर, ते सत्ताधारी बाकावरही बसले. त्यातून त्यांचा पाठिंबा अजितदादांना आहे हे उघड झालं. मात्र हे सगळं असतानाच, उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी एक लेटरबॉम्ब टाकला आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
फडणवीसांनी काय म्हटलंय पत्रात
जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे आज अजित पवार गटात सहभागी होत सत्ताधारी बाकावर बसले. मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही टीका होऊ लागली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे. सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर येऊ लागल्याची चर्चा होऊ लागली आहे.
दर्डा यांच्या घरी नवाब मलिक उपस्थित निघून गेल्यानंतर फडणवीसांची कालपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. दरम्यान माजी खासदार विजय दर्डा यांच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं..या कार्यक्रमाला नवाब मलिकांनी उपस्थिती लावली. मात्र कार्यक्रमातून मलिक निघून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस स्नेहभोजनासाठी विजय दर्डा यांच्या घरी दाखल झाले.
विधानभवन परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा मराठा आरक्षणासंदर्भात बॅनरबाजी
विधान भवन परिसरात रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी मराठा आरक्षणासंदर्भात मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमधून काही प्रश्न मराठा आरक्षणासंबंधी नेत्यांना विचारण्यात आले आहेत. काही ठिकाणी बॅनर काढले जातात तर काही ठिकाणी अजूनही बॅनर लावण्यात आलेले आहेत. या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात तातडीनं चर्चा व्हावी अशी संघटनांची मागणी आहे.