Leopard Attack : भडगाव तालुक्यात दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास गुढे शिवारात एका शेतकऱ्याच्या बकऱ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. यात १८ शेळ्यांचा फडशा पाडला असून यात संबंधित शेतकऱ्याचे सुमारे दीड लाखाच्यावर नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे. तर पाचोरा तालुक्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास रानडुकरांचा पाठलाग करणाऱ्या बिबट्यासह रानडुक्करदेखील विहिरीत पडले असल्याची घटना समोर आली. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळात्यानंतर पाचोरा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पिंजऱ्यात अडकवून बाहेर काढले व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रथमोपचार करून घेण्यात आले.
सद्यस्थितीत गिरणा पट्ट्यातील शेतकरी वर्गाकडून मान्सूनपूर्व शेतमशागतीवर भर दिला जात आहे. त्यातच चाळीसगाव, वाडे, टेकवाडे, मेहुणबारे तसेच भडगाव तालुका परिसरात गुढे, वाडे, नावरे, कोळगाव आदी भागात वन्यप्राणी बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढतच आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून शेतमशागत कामांना जाण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास भडगाव तालुक्यात गुढे येथील ईश्वर महाजन पहाटे दूध काढण्यासाठी गेले असता यांच्या शेताच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केत्याची घटना उघडकीस आली. यात १८ शेळ्यांचा दुखापतीत मृत्यू नाखाचे झाला असून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच पाचोरा वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
गेल्या वर्षभरात गुढे, वाडे, नावरे, कोळगाव आदी गिरणा पट्ट्याच्या गावांमध्ये बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढले आहेत. आतापर्यंत सुमारे चार ते पाच जणांचा यात मृत्यू झाला असून पशुधनाचीदेखील हानी झाली आहे. मंगळवारी पहाटेदेखील पाचोरा तालुक्यातील अंतुर्ती-तोहटार शिवारात बिबट्या रानडुकरांचा पाठलाग करीत असताना भगवान कोष्टी या शेतकऱ्याच्या शेतात बिबट्या व रानडुक्करदेखील विहिरीत पडले. यात बिबट्याने रानडुकराची शिकार केली. दरम्यान विहिरीला पाणी कमी असल्याने बिबट्या सुरक्षित होता.
बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच पाचोरा वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी, वनविभाग व पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला पिंजऱ्यात बंद करीत सुरक्षितरीत्या बाहेर काढले. या वेळी अंतुर्ली गावातील नागरिकांनीही या मोहिमेत मदत केली. तसेच पशुसंवर्धन विभाग अधिकाऱ्यांना बोलवून प्राथमिक उपचार करीत बिबट्याला सुरक्षित स्थानी ठेवण्यात आले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
- सुदैवाने विहिरीत पाणी कमी असत्याने बिबट्या सुरक्षित होता. पाचोरा बचाव पथकाच्या नेतृत्वाखालील जळगाव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उघड्या विहिरीत पडलेल्या बिबट्यास पिंजऱ्यात अडकवून सुरक्षितरीत्या विहिरीबाहेर काढले.
प्रवीण ए.. उपवनसंरक्षक, जळगाव.