जळगाव । चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात भयंकर घटना घडली आहे. चार वर्षाच्या रसला पावरा या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. चिमुकली लिंबूच्या बागेत खेळत असताना बिबट्याने हा हल्ला केला असून, या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात काजा उर्फ काशीराम पावरा यांच्या मुलीवर बिबट्याने झडप घालून तिला ठार केल्याची माहिती मिळाल्यावर उपवनसंरक्षक प्रवीण ए., सहायक वनसंरक्षक अमोल पंडित, आणि परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वन विभागाने तत्काळ उपाययोजना राबवत परिसरात दहा ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. शिवाय चार पिंजरे बसवून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई यांच्या पथकाने बिबट्यावर सतत नजर ठेवली आहे.
दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना वन विभागाने आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. तसेच हल्लेखोर बिबट्याला लवकरच जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ही दुर्दैवी घटना दोन जानेवारी रोजी घडली असून, वन्यजीवांच्या सुरक्षिततेविषयी आणि मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.