---Advertisement---
अंतुर्ली (ता. शिरपूर) : शिवारातील तहऱ्हाडी रस्त्यावरील वंदनाबाई भालचंद्र ईशी यांच्या मळ्यात बांधलेल्या तीन वर्षीय वासराला बिबट्याने फस्त केल्याची घटना समोर आली असून, परिसरात हिंसक प्राणी आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील वंदनाबाई भालचंद्र ईशी यांच्या मळ्यात बैल, म्हशी, गाई, वासरू बांधलेले असतात. शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) पहाटे चारच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून वासरू फस्त केल्याचे सकाळी लक्षात आले.
याबाबतची माहिती वासडी वनपाल के. आर. सूर्यवंशी यांना कळविण्यात आली. त्यांनी पायाच्या मागाची पाहणी केली असता, बिबट्या असल्याचे सांगितले, तसेच बिबट्याच्या मागासोबत लहान माग आढळून आल्याने बिबट्या मादी असल्याचा निष्कर्ष काढला. परिसरात मका, ऊस, केळी, कपाशी या पिकांची लागवड करण्यात आली.
ही पिके परिपक्वतेच्या मार्गावर आहेत, तसेच वातावरणातील थंडी कमी होऊन उष्णता वाढत्याने पिकांना पाणी देण्याचें काम सुरू आहे. मका, ऊस, केळी, पपई ही पिके उंच असल्याने बिबट्याला लपण्यास मोठा वाव असला, तरी शेतकऱ्यांनी शेतात गेल्यावर फटाके फोडावेत तसेच शेकोटीस मशालीचा वापर करून सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनपाल के. आर. सूर्यवंशी यांनी केले. घटनास्थळी डॉ. भामरे यांनी भेट देऊन वासराचा पंचनामा केला. वनरक्षक ए. टी. काशिदे, वनमजूर दिनेश पावरा, सुरेश पावरा यांच्यासह वासडी वनपाल के. आर. सूर्यवंशी तपास करीत आहेत.
तन्हावदला हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात बालिका जखमी
तळोदा : तालुक्यातील तन्हावद पुनर्वसन गावात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिका गंभीर झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. प्राची दिनेश तडवी (वय ३) असे तिचे नाव आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, आता तिची प्रकृती स्थिर आहे. २३ ऑक्टोबरला दुपारी साडेचारच्या सुमारास दिलीप तडवी यांच्या कपाशीच्या शेतात वेचणीसाठी गेलेल्या आईने प्राचीला झाडाला बांधलेल्या झोक्यात झोपविले. त्या वेळी प्राची तडवीवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला.
त्यात तिच्या डोक्यावर व डोळ्याजवळ, नाकावर गंभीर दुखापत झाली असून, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत तळोदा येथील वनविभागाचे अधिकारी शंतनू सोनवणे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, हिस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात बालिका जख्मी झाली आहे. कोल्ह्याने हल्ला केला. त्याला ओरडून पळवून लावले, असे काही शेतमजुरांचे म्हणणे आहे. वनविभागाने हिंस्त्र प्राण्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. वनविभागाकडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









