तरुण भारत लाईव्ह । २१ जून २०२३ । कर्नाटकात सत्तेत आल्या-आल्या काँग्रेस सरकारने अभ्यासक्रमातून डॉ. हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय यंस्वसेवक संघावर तीनदा बंदी घालण्यात आली आणि तिन्ही वेळा केंद्रात काँग्रेस सरकार असतानाच ती घालण्यात आली होती. बंदी घातली की संघाची वाढ खुंटेल, अशी काँग्रेसची अपेक्षा असेल. प्रत्यक्षात तसे झाले नाही. संघ शताब्दीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. डॉ. हेडगेवार यांचा आज (२१ जून) स्मृतिदिन आहे. त्यांच्या निधनाला ८३ वर्षे झाली. स्वत: डॉ. हेडगेवार यांना अल्पायुष्य लाभले. मात्र, त्या अल्पावधीत त्यांनी संघ देशातील अनेक प्रांतात पोहोचविला. त्यांनी स्वत:च्या जीवनातून स्वयंसेवकांना प्रेरणा दिली; आणि डॉ. हेडगेवार यांच्या देहावसानानंतर गेली आठ दशके संघाला ज्या कोट्यवधी स्वयंसेवकांच्या, कार्यकर्त्यांच्या, प्रचारकांच्या माध्यमातून धुमारे फुटत राहिले ती डॉ. हेडगेवार यांची जिवंत स्मारके आहेत, असेच म्हटले पाहिजे.
गेल्या १० दशकात संघ देशभर का रुजला याचे चिंतन धडे वगळणा-यांनी करावयास हवे. याची प्रमुख कारणे म्हणजे समर्पण आणि आत्मविलोपी वृत्ती ही आहेत. संघाचे काम करून व्यक्तिगत, भौतिक लाभ होईल, अशी आकांक्षा स्वयंसेवकांनी धरली असती, तर अन्य अनेक संघटना लुप्त झाल्या त्याच रांगेत जाऊन संघ बसला असता. हिंदुत्वाला जेव्हा स्वीकारार्हता कमी होती अशा काळात संघ कार्यकर्त्यांनी विजिगीषु वृत्ती दाखविली नसती, निर्धार प्रकट केला नसता तर संघ निष्प्रभ झाला असता. बंदी घालून संघ कार्यकर्त्यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याचा काँग्रेस सरकारांचा हेतू सफल झाला असता तर संघाने शताब्दीपर्यंत वाटचाल केली नसती. संघाचे मर्म हे सामान्य असूनही असामान्य कर्तृत्व गाजविणा-या स्वयंसेवकांच्या त्यागात आहे. ज्यांची नावेही कधी माहीत होणार नाहीत अशा समर्पित कार्यकर्त्यांनी कुचेष्टा होण्याच्या काळात संघाचे काम निश्चयाने वाढविले; आपला संकल्प ढळू दिला नाही. अशा कार्यकर्त्यांनी संघ समाजात रुजविला. सेवाकार्यांतून संघाची स्वीकारार्हता समाजात वाढविली.
योगायोग असा की, पहिल्या तिन्ही सरसंघचालकांचा स्मृतिदिन जून महिन्यातच येतो. या तिघांनी आव्हानात्मक काळात संघाचे नेतृत्व केले. बाळासाहेब देवरस यांच्या कार्यकाळातच संघावर दोनदा बंदी आली- १९७५ आणि १९९२ साली. मात्र, बाळासाहेबांच्याच काळात सेवाकार्यांचे जाळे देशभर उभे राहिले. संघाचे हे मर्म आहे. सामाजिक समस्या त्याच राहत नसतात, त्या सतत बदलत असतात. त्या स्थितीत मूलभूत तत्त्वांना धक्का न लावण्याची कठोरता दाखवत धोरणात्मक बदल करण्याचा लवचिकपणा दाखवावा लागतो. संघाने हा समतोल साधला; हे करताना हिंदू समाज जागरण, संघटन या तत्त्वांना धक्का लावला नाही. त्यासाठी आत्मविलोपी वृत्तीने काम करणा-या कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली पाहिजे आणि त्यासाठी प्रेरणा आणि प्रशिक्षण या दोन्हीची आवश्यकता आहे, याचा विसर पडू दिला नाही. परिणामतः संघाच्या पुढे-मागे स्थापन झालेल्या संघटना लुप्तप्राय झाल्या; संघाची वाटचाल मात्र दिमाखात सुरू आहे.
वयाच्या ८० व्या वर्षांत असताना वर्धेचे अप्पाजी जोशी आणिबाणीत तुरुंगात होते. १९७९ साली त्यांचे निधन झाले. आपल्याला संघकार्य करता करता मृत्यू यावा, अशी त्यांची इच्छा होती आणि झालेही तसेच. बाळासाहेब देवरस यांची नागपुरात भेट घेऊन वाहनात बसत असताना त्यांचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू झाला. लक्ष्मणराव इनामदार यांनी गुजरातेत १९४५ च्या सुमारास थोडक्या कालावधीत ४५ कार्यकर्त्यांना प्रचारक म्हणून निघण्याची प्रेरणा दिली आणि आठ वर्षांत २०० शाखा सुरू केल्या. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर रामभाऊ म्हाळगी केरळात प्रचारक म्हणून गेले. दत्तोपंत ठेंगडी यांनी एकदा असे म्हटले होते की, ‘‘रामभाऊंनंतर मी तेथे गेलो; माझे काम एकदम सोपे झाले होते.” ही नावे केवळ प्रातिनिधिक. अशा कार्यकर्त्यांची मांदियाळी संघात उभी राहिली आणि त्यामुळे संघ वर्धिष्णू राहिला आहे. मुद्दा या त्यागाची, समर्पणाची, निष्ठेची जी मुहूर्तमेढ डॉ. हेडगेवार यांच्या काळात रोवली गेली, ती पुढे जराही न ढळता त्याच ऊर्मीने सुरू कशी राहील हा आहे. व्यक्तिनिर्माणाची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते; ती सातत्याने, अथकपणे करावी लागते. डॉ. हेडगेवार यांच्या काळात संघाचे कार्यकर्ते भारतातील विविध प्रांतात जाऊन संघकार्य रुजवायला लागले. मुळात त्या वेळी संघ हा विचारच अभिनव होता.
जातिभेदविरहित हिंदू समाजनिर्मिती करण्यासाठी संघ नावाची संघटना डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केली; तेव्हा दोन पायंडे त्यांनी विशेषत्वाने घालून दिले. एक व्यक्तिनिरपेक्ष कार्य आणि दुसरा प्रसिद्धीपासून अलिप्तता. जे करायचे ते समाजासाठी; व्यक्तिगत हितसंबंध जपण्यासाठी नव्हे. एकदा हे दोन्ही दोष कोणत्याही संघटनेत शिरले की, संघटनेची घसरण सुरू झाली, असे मानायला हरकत नाही. सुरुवातीच्या काळात कोणत्याही संघटनेचे हेतू उदात्त आणि ध्येय भव्यच असतात. प्रश्न काळाच्या ओघात त्यातील तेज तसेच राहते की संघटना भरकटते हा असतो. याचे कारण संघटना वाढत जाते तेव्हा सुरुवातीच्या काळातील पीळ कमी होण्याचा संभव असतो. थोडक्या कार्यकर्त्यांना ध्येयप्रेरित ठेवता येते; पण संघटन विस्तारते तेव्हादेखील तोच ध्येयवाद आणि तीच तत्त्वे कायम ठेवणे आव्हानात्मक असते. हा क्रम सतत सुरू ठेवायचा तर संघटनेचे नेतृत्व आणि व्यक्तिनिर्माणाची प्रक्रिया या दोन्हीचा कस लागत असतो. विस्तारात संख्या वाढते; मात्र दर्जा घसरण्याची भीती असते.
तथापि, ध्येयवाद तसाच कायम झिरपत ठेवण्यात ज्या संघटना यशस्वी होतात; त्या भरकटत नाहीत किंवा उद्देशहीन होत नाहीत. गेल्या ९८ वर्षांत संघाने असे उद्देशहीन होणे टाळले आहे. अन्यथा संघनिर्माता डॉ. हेडगेवार यांच्या निधनास आठ दशके उलटून गेल्यावरही संघाचा विस्तार होण्याचे आणि संघाची स्वीकारार्हता वाढण्याचे कारण नव्हते. संघ कार्यकर्त्यांची चारित्र्यसंपन्नता आणि त्यामुळे संघाला संघटन म्हणून लाभलेली विश्वासार्हता याचा विचार संघविरोधक करणार की नाही हा प्रश्न आहे. कर्नाटक सरकार डॉ. हेडगेवार यांच्या कर्तृत्वाच्या माहितीपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचे समाधान मानत असेल; त्याच विद्यार्थ्यांना संघ ठाऊक होणार नाही, असे थोडेच आहे? अभ्यासक्रमातून डॉ. हेडगेवार यांच्यावरील धडा वगळला तरी बिन भिंतीच्या उघड्या शाळेत विद्यार्थ्यांना संघाचा परिचय होणारच. संघाची सेवाकार्ये, संघ आणि संघप्रेरित संघटनांनी कामगार क्षेत्रापासून शेतक-यांपर्यंत सर्व क्षेत्रांत केलेले संघटन हे काँग्रेस दडवून ठेवू शकेल? ओडिशात झालेल्या रेल्वे दुर्घटनेत मदतकार्यात संघ स्वयंसेवक सिद्ध झाले, हे लपविता कसे येणार? संघ समाजव्यापी झाला आहे. अभ्यासक्रमातून डॉ. हेडगेवार यांच्यावरील धडा वगळण्याचा कोतेपणा काँग्रेस सरकारने केला तरी समाजातून संघाला कसे वगळणार?