नवसंकल्पाची गुढी उभारू या…!

गुढीपाडवा : चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात उद्या साज-या होणा-या गुढीपाडव्याचा गोडवा आपल्या संस्कृतीत अवीट असाच आहे. पाडवा म्हणजे शुभ दिवस. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक. गुढी हे आनंदाचे प्रतीक, गुढी म्हणजे एकप्रकारचा ध्वज. विजयानंतर गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करतात. प्राचीन आणि समृद्ध परंपरेने नटलेल्या भारतात उत्सवप्रियता ओतप्रोत भरलेली असल्याने कुठलाही सण म्हटले की, सर्वत्र उत्साहाला उधाण आलेले असते. गुढीपाडव्यासारखा वर्षारंभाचा सण तर मांगल्याचे लेणेच घेऊन येत असतो. शिवाय हा सण साजरा करण्यामागे अनेक कारणे असल्याने त्याचे सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व अधिकच आहे. हिंदू संस्कृतीनुसार भारतात या दिवसापासून नूतन वर्षाची सुरुवात होते; म्हणूनच त्याला शालिवाहन शकारंभ असेही म्हणतात. शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळविला. तेव्हापासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली. हा विजयोत्सव दारात गुढी उभारून साजरा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला परंपरेत विशेष महत्त्व आहे.
चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र याच दिवशी अयोध्येत परतले. त्याचा नगरवासीयांना आनंद झाला. त्यांनी प्रभू रामाचे गुढी उभारून स्वागत केले. ती गुढी स्वागताची होती, आनंदाची होती, तशीच ती रावणावरच्या विजयाची होती. पूर्वीच्या काळी विजयोत्सव साजरा करण्यासाठी, तो आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारत असत. भगवान विष्णूंनी सातवा रामअवतार चैत्र शुद्ध नवमीला घेतला. याच दिवशी श्रीराम नवमी साजरी केली जाते. श्रीराम वनवासात असताना त्यांची भेट सुग्रीवाशी होते. वानरराज वालीच्या अत्याचाराचे सर्वकथन सुग्रीव श्रीरामांसमोर करतात. अखेर वालीचा वध करण्याचा निर्णय श्रीराम घेतात. वालीचा वध करून श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केले. त्यामुळे प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला. त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, असेदेखील सांगण्यात येते.
विजयाची गुढी उभारतात याचा उल्लेख ज्ञानेश्वरीत येतो.
‘माझी अवसरी ते फेडी। विजयाची सांगे गुढी
येरू जीवी म्हणे सांडी। गोठी यिया।।” ज्ञानेश्वर माउलींनी गुढीला विजयाची गुढी असे संबोधले आहे.
संत चोखामेळा यांचा एक अभंग वारकरी संप्रदायात विशेष प्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात…
टाळी वाजवावी, गुढी उभारावी।
वाट ही चालावी पंढरीची।।
धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. आपल्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ महाराज हर्षाची उभवी गुढी, ज्ञातेपणाची, भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची, भक्तीची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात.
गुढीचा आणखी महत्त्वाचा संस्कार म्हणजे ती प्रकाशाच्या, आकाशाच्या दिशेने वर, ताठ उभी राहते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने उभी राहते. याचा महत्त्वाचा संस्कार म्हणजे जमिनीशी निगडित प्रपंच करताना जीवनाला काहीतरी उच्च ध्येय असायला हवे आणि हे ध्येय केवळ व्यक्तिजीवनापुरतेच राहू नये तर राष्ट्रालाही ध्येय, आकांक्षा, पुढे जाण्याची इच्छा असली पाहिजे, हेच या गुढीच्या माध्यमातून अधोरेखित होते. गुढीला सजवताना रेशमी वस्त्र, धातूचा कलश (भांडं) घट्ट बांधून, तिला फुलांची माळ घालतात. शिवाय कडुलिंबाची छोटी फांदीही बांधतात. काही भागांत साखरेच्या पदकांची (गाठी) माळही घातली जाते. या सा-या पदार्थांचा एक विशिष्ट संदेश आहे. गुढीपाडव्याला संसार पाडवा म्हणतात म्हणून वस्त्र, धातूचा कलश या गोष्टी आवश्यक ठरतात. त्याचप्रमाणे पुष्पमालांची सजावट करून कडुलिंब व साखरेच्या पदकांची माळ संदेश देतात की, नूतन वर्षात व्यक्तिगत जीवनात तसेच राष्ट्रजीवनात कडू-गोड, सुख-दुःखाचे प्रसंग असणारच. सा-या घटना-प्रसंगांचा हसतमुखानं स्वीकार करायला हवा. वसंत ऋतूचा आरंभदेखील याच दिवशी होत असल्याने प्राकृतिकदृष्ट्याही हा दिवस लक्षवेधी ठरतो.
पाडव्याला भल्या सकाळी मंगलस्नान करून कडुलिंबाची पाने, मिरे, हिंग, लवंग, जिरे, ओवा यांचे मिश्रण सेवन करण्याची आरोग्यकारक प्रथादेखील आपल्या पूर्वजांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन अधोरेखित करून जाते. याच दिवशी ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केल्याची एक कथा पुराणात आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मपूजेला महत्त्व दिले जाते. अशा अनेकविध कारणांमुळे हिंदू संस्कृतीमध्ये हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्याचे समजले जाते. साहजिकच कोणत्याही नव्या कार्यारंभासाठी गुढीपाडव्याचा दिवस उत्तम मानला जातो. किंबहुना या दिवशी नव्या पर्वाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जात असते. गुढीपाडवा म्हणजे सळसळता उत्साह, अपरिमित आनंद, अक्षय ऊर्जा आणि अखंड चैतन्य. गुढीपाडवा म्हणजे सकारात्मकता आणि विजयाचा विश्वास. प्रतिकूलतेवर मात करीत, दुर्दम्य इच्छाशक्तीचा आविष्कार आणि क्षमतांचे प्रकटीकरण करीत केलेली संकल्पपूर्ती म्हणजे गुढीपाडवा. हा पाडवा व्यक्ती, समाज आणि राष्ट्रातदेखील चैतन्य घेऊन येतो. भारताची म्हणजे येथील कोट्यवधी भारतीयांची संकल्पशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती एकवटल्याने आज संपूर्ण जगात भारताच्या सामथ्र्याची, आत्मविश्वासाची गुढी यापूर्वीच उभारली गेली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर उभारलेली ही विजयाची गुढी म्हणजे जी-२० देशांचे अध्यक्षपद भारताकडे आहे. ही गुढी जशी विजयाची आहे तशीच ती आत्मविश्वासाची आहे अन् सहकार्याचीदेखील आहे. गुढीपाडव्याच्या अगदी दोन दिवस आधीच महाराष्ट्रात, उपराजधानी नागपुरात सी-२० देशांचे प्रतिनिधी नागरी प्रश्न, समस्यांच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी, त्या सोडविण्यासाठी येत आहेत. भारताची पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, येथील प्रचंड युवा मनुष्यबळ, उद्योग, व्यापार, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान व अन्य क्षेत्रात केलेली प्रचंड प्रगती यामुळे भारताने विविध क्षेत्रात उभारलेली यशाची उंच गुढी देशवासीयांना अभिमानास्पद अशीच आहे. महामारी तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे विविध संकटे आणि समस्या देशवासीयांपुढे उभ्या राहिल्यात, हे सत्य आहे. मात्र, देशात खंबीर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण मजबूत सरकार असल्याने या संकटांवर आपण मात केली आहे. जगातील इतर देशांपेक्षा भारताची स्थिती खूपच चांगली आहे. विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनीही ही बाब मान्य केली आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि तुफान गारपिटीने उभे पीक आडवे झाल्याने शेतक-यांवर संकट कोसळले हे खरे. मात्र, आधीच सांगितल्याप्रमाणे या नैसर्गिक संकटांवर मात करीत पुढे पुढे जाण्याचे सामर्थ्य आमच्या शेतक-यांमध्ये आहे. या मंगल दिनापासून ही स्थिती येत्या काळात उत्तरोत्तर सुधारत जाईल, अशी आशा बाळगायला नक्कीच वाव आहे.
गुढीपाडवा हा नववर्ष संकल्पांचा दिवस. काहीतरी नवी गोष्ट शिकणे, नवे कौशल्य प्राप्त करणे, नवे छंद आत्मसात करणे; त्याचबरोबर आपल्यातले काही दोष-दुर्गुण दूर करण्याचा संकल्प यानिमित्त केला जातो. पण त्याच्यामागे इच्छाशक्ती, जिद्द, सातत्य नसेल तर संकल्प अपूर्णच राहतील. दिसायला आकाशातल्या चंदेरी-रुपेरी ढगांसारखे सुंदर दिसतील. पण जोराचा वारा आला की विस्कळीत होऊन विरून जातील.  मात्र, सकारात्मक विचार व नव्या इच्छाशक्तीने नवे संकल्प अवश्य केले पाहिजेत व ते पूर्णही केले पाहिजेत. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे सर्वत्र चैतन्याची अनुभूती येते. मनावरील नैराश्याचे, नकारात्मकतेचे ढग दूर लोटण्यास असे उपक्रम निश्चितच हातभार लावत असतात. त्याद्वारे संचारणाèया उत्साहातून सर्जनशीलतेची, निर्मितीची नवचेतना जागृत होत जाते आणि त्यातूनच समृद्धीची शिखरेही खुणावू लागतात. ही शिखरे पादाक्रांत करण्याची ऊर्मी तमाम भारतवासीयांच्या अंगी भरून राहो. अनेक सांस्कृतिक संदर्भ असलेला हा गुढीपाडव्याचा सण, आनंदाची, विजयाची पताका असणारी गुढी आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने उभारतो. या गुढीच्या प्रतीकात्मक संदेशाकडे पाहून जीवनदृष्टी घेत, सरत्या वर्षातील कटू आठवणी, दुस-याबद्दलची मनातली अढी हे सगळे सोडून नवीन वर्षाचे स्वागत करूया.