वर्षाचे कॅलेंडर बदलताना स्वतःलाही बदलू या

#image_title

नवे वर्ष सुरू झाले की आपण भिंतीवरचे कॅलेंडर बदलतो. आता त्याबरोबरच स्वतःलाही बदलण्याची वेळ आली आहे. आपण शांतपणे आपल्या वाईट सवयीची यादी केली तर आपल्यालाच थक्क व्हायला होईल! आपला कितीतरी वेळ आजकाल मोबाईलमध्ये जातो. सोशल मीडिया सर्च हा एक नवा रोग प्रत्येकाला लागला आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण कितीतरी वेळ सोशल मीडियावर वाया घालवतात. त्यात काही माहिती निश्चितच ज्ञानात भर घालणारी असते. मनोरंजन करणारी असते. पण त्या पायी आपण आपली मूळ कर्तव्ये विसरत चाललो. मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करताहेत. घरातला एकमेकांशी संवाद कमी झाला आहे. अगदी जेवताना सुद्धा आपली बोटे मोबाईल स्क्रीनवर खेळत असतात. त्यामुळे आपले वाचन कमी झाले आहे. कुणाच्याच हातात पुस्तकं दिसत नाहीत. कुणीही ग्रंथालयात जाताना दिसत नाहीत.

नव्या वर्षात हे बदलायला हवे. कोणतीही सवय एकदम जात नाही. हळूहळू जाईल. पण प्रयत्न तर करायला हवेत ना? घरातली मुले वृद्ध मंडळींशी बोलत नाहीत. वय झाले की एकटेपण वाढत जाते. हातातून बरेच काही निसटत चालले आहे ही भावना आतल्या आत पोखरत असते. अशावेळी इतरांचा आधार हवाहवासा वाटतो. पूर्वी लग्न समारंभ, सणवार या निमित्ताने का होईना कुटुंबातली माणसे एकत्र जमायचे. आता एकमेकाकडे जायला वेळ नाही. मुख्य म्हणजे तशी गरजच भासत नाही. मी बरा अन् माझे लहानसे कुटुंब बरे अशी कुपमंडूक वृत्ती वाढीला लागली आहे. नव्या वर्षात नव्याने नाती जोपासायला शिकले पाहिजे.

आपल्यातली सहनशीलता कमी होत चालली आहे. पटकन राग येतो प्रत्येकाला. आवाजात मार्दव राहिले नाही. आपलेच म्हणणे खरे करण्याचा अट्टहास. दुसऱ्याचे ऐकून घ्यायचेच नाही. बस, मेरे मुर्गि की एकही टांग.. ही एकांगी वृत्ती वाढली आहे. अशाने कुठल्याही समस्या सुटत नाहीत. आपण समंजस व्हायला शिकले पाहिजे. क्षमा करायला शिकले पाहिजे. दोन पावले पुढे जायचे असेल तर त्याआधी एक पाऊल मागे घ्यायला शिकले पाहिजे. तरच मानवी नाते संबंध टिकतात. नव्या वर्षाचा संकल्प म्हणून नाती जोपासायला प्राथमिकता दिली पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाने आजच्या जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. भविष्यात आणखीन नवे बदल अपेक्षित आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचे नवे वादळ येऊ घातले आहे. या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचे जसे फायदे तसेच तोटेही आहेत. आपल्याला या परिवर्तन चळवळीपासून अलिप्त राहता येणार नाही. त्यातले काय किती घ्यायचे, अन् काय सोडून द्यायचे हे अर्थातच आपल्यावर अवलंबून राहणार असले तरीही आता हे आधुनिक तंत्र आपल्याला समजून घ्यावेच लागेल. त्यामुळे जे जे नवे ते मीही शिकेन हाही संकल्प कॅलेंडर बदलताना केलेला बरा. अनेकांना भूतकाळात रमायची सवय असते. आमच्या वेळी असे आमच्या वेळी तसे ही कायम रेकॉर्ड असते काही जणांची. नव्या पिढीची जीवन पद्धती एकदम वेगळी असणार आहे. त्यांना नावे ठेवणे सोडा. नव्याची तुम्हीही कास धरायला शिका. आता आजीवन शिक्षणाला महत्त्व आले आहे. कारण आपण सतत शिकलो नाही, आपल्याच जुन्या जमान्यात रमत राहिलो तर आपला निभाव लागणार नाही. दूर फेकले जाऊ. त्यासाठी सतत शिकत राहणे, नव्या पिढीकडून नव्या संकल्पना समजून घेणे, त्या हळूहळू आत्मसात करायला शिकणे, मुख्य म्हणजे कमी बोलणे अन् जास्त ऐकणे हे धोरण आता स्वीकारायला हवे.

शिक्षण, व्यवसाय, प्रोफेशन, मार्केटिंग, समाजव्यवस्था, राजकारण, अर्थकारण ही सर्वच क्षेत्रे झपाट्याने बदलत आहेत. ते स्वीकारावे लागेल. आपली मते नव्या पिढीच्या गळी उतरवण्याचा अट्टहास चालणार नाही. नव्या पिढीला देखील वाडवडिलांना सांभाळून घ्यावे लागेल. वेळ पडल्यास हात धरून, आधार देत पुढे न्यावे लागेल. जर प्रत्येक जण एक दुसऱ्यावर अवलंबून असेल तर त्यासाठी समंजसपणा, तडजोड, सहानुभूती, अनुकंपा हे गुणधर्म आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असले पाहिजेत. एक दुसऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होणे, एकमेकांच्या अडचणी, उणिवा समजून घेणे, त्या उणिवांसह त्या व्यक्तीचा स्वीकार करणे हा खरा आपला धर्म असला पाहिजे. दुसऱ्यांनी बदलावे, अवतीभवतीचे जग बदलावे असे आपल्याला वाटत असेल तर सुरुवात स्वतःपासून केलेली बरी. आपण बदललो, आपले आचारविचार बदलले की अवतीभवतीचे जग देखील आपोआप बदलेल. या नव्या बदलासाठी सज्ज होऊ या नववर्षाच्या पहिल्या दिवशी.