लाईफ इज ब्युटीफुल

तरुण भारत लाईव्ह । ९ एप्रिल २०२३। ‘दिलों में तुम अपनी बेताबियॉं लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम….’फरहान अख़्तरच्या काहीशा घोगर्‍या, काहीशा तलम आवाजातली ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातली ही कविता आठवतेय? आपण जगतो म्हणजे नेमकं काय करत असतो? तर दर दिवशी कुठली ना कुठली जबाबदारी पार पाडत असतो.

घर, कुटुंब, ऑफिस, नातेवाईक यांच्या एक ना एक जबाबदार्‍या आदळत असतात. आपण त्या निभावत असतो. त्यातच जीवनाची इति कर्तव्यता मानत असतो. वरून या जबाबदार्‍यांचंही प्रदर्शन मांडलं जातं. जोवर कुणी सहानुभूती व्यक्त करत नाही तोवर कले जे को थंडक नही मिलती. त्यात दुर्दैवाने बायका आघाडीवर आहेत. ‘संसारासाठी मी किती खपतेय’ याची जणू चढाओढच लागते एकमेकींमध्ये. या खपण्याचं ग्लोरिफिकेशन करता करता संपून जातं आयुष्य. बरं आपलं हे खपणंच आपण नकळतपणे पुढच्या पिढीच्या झोळीत टाकतोय हे लक्षात येतंय? जो पैसा कमावण्यासाठी इतके धावत आहोत त्याचा किती टक्के भाग स्वतःच्या आनंदासाठी खर्च केला जातोय याचा कधी विचार केलाय? सेव्हिंग गरजेची आहेच, पण इतकी ओढाताण करून जमा करून ठेवलेली पुंजी अचानकच कधीतरी सोडून जावी लागू शकते हेही तितकंच खरं आहे. भविष्यात करू, भविष्यात पाहू, अजून खूप आयुष्य आहे, असं म्हणत स्वतःच्या इच्छा मारत जगणारे लोक पाहिले की वाटतं भविष्याची नेमकी कुठली खात्री आहे यांच्याकडे, जी सांगतेय तुम्हाला की उद्याचा दिवस तुम्ही पाहू शकणार आहात!

कोरोना काळात आयुष्याची ही क्षणभंगुरता जास्त प्रकर्षाने जाणवली. लॉकडाऊनच्या त्या काळात जेव्हा सगळं काही इथेच टाकून निघून गेलीत माणसं. तेव्हा अनेकांनी ठरवलं की आता हे संकट गेलं की भरभरून जगायचं. वर्तमानातला दिवस आपला समजायचा. पण ते संकट गेलं आणि आपण पुन्हा धावण्याच्या त्याच शर्यतीत आलो आहोत. पैसा, पद, प्रतिष्ठा, नावलौकिक कसल्या कसल्या स्पर्धा आहेत. अगदी शेवटपर्यंत पोहोचूनसुद्धा जिंकण्याचा आनंद उपभोगण्याइतकी क्षमता राहणार आहे का आपल्यात? धाप लागून कोसळू इतके धावतोय आपण या स्पर्धेत.

कुणी मध्यावर कोसळणार तर कुणी शेवटी इतकाच काय तो फरक. विसाव्याच्या कितीतरी जागा मागेच राहून चालल्यात, याची जाणीव मृत्यू समोर दिसल्यावरच होणार आहे का आपल्याला? हे असं जीव तोडून धावणं म्हणजे जगणं का? कुणी म्हणेल आनंदासाठी खूप जास्त पैसा गरजेचा आहे; तर तसेही अजिबात नाही. भरउन्हात रस्त्याच्या कडेला कुणी पाहिलं तर काय म्हणेल याचा विचार न करता थंडगार ब़र्फाचा गोळा खाण्यात आनंद असतो, रिमझीम पाऊस सुरू असताना एकटेच बाईकवर लांबपर्यंत जात टपरीवरचा चहा पिण्यात आनंद असतो, सुटीच्या दिवशी एखाद्या ऑफ बिट किनार्‍यावर तळव्याखाली समुद्राची लाट घेण्यात आनंद असतो आणि सिनेमागृहात एखाद्या आवडत्या सीनवर शिट्टी मारण्यात पण तर आनंदच असतो. प्रत्येक वेळी या आनंदाला पैशांचं कारण देत का नाकारत असतो आपण? बर्‍याचशा गोष्टी ज्या कराव्याशा वाटतायेत त्या का करत नाही आपण? कारण काय तर कधी आपल्याकडे वेळ नसतो, तर कधी सवड तर कधी केवळ लोक काय म्हणतील याचा विचार. हसणं असो की रडणं चेहर्‍याची घडी मोडता कामा नये. इतकं सगळं नीटस, आखीव रेखीव.

फुलदाणीत तर फुलं छान दिसतातच, पण विखुरलेल्या फुलांचा सडा जास्त लोभस दिसतो. कारण झाडावरून ती त्यांना हवी तशी, मनसोक्त जगून जमिनीवर ओघळलेली असतात. हे असं खुललेलं, दरवळलेलं मनमुराद जगता यावं.
हिरमुसलेले, पाठीवर प्रचंड ओझं असल्याचा आभास निर्माण करणारे चेहरे पाहिले की वाटतं नशिबापेक्षा यांनी स्वतःच स्वतःची परीक्षा घ्यायचं ठरवलंय. नशिबाने तर खूप वेळा संधी दिली खुश राहण्याची पण यांनाच ती नकोय. पुन्हा तेच…दुःखाचं ग्लोरिफिकेशन! ‘लाईफ इज ब्युटीफुल’ नावाच्या एका इटालियन मुव्हीमध्ये ज्यू लोकांच्या छळ छावणीमध्ये अडकलेला नायक त्याच्या मुलाला तिथली दाहकता सुसह्य व्हावी म्हणून सांगतो की, हा एक प्रकारचा गेम आहे आणि आपण सर्व्हाईव झालो तर आपल्याला एक हजार पॉईंट्स मिळणार आहेत आणि अशाप्रकारे तो त्याचे शेवटचे दिवससुद्धा आनंदात व्यतीत करायला भाग पाडतो. जगण्याची ही दुर्दम्य आशा अचंबित करणारी आहे. आपण आपल्याभोवती त्या कॅम्पसारखं काटेरी कुंपण आखून घेतलंय का? जिथे मोकळ्याने श्र्वास घ्यायलासुद्धा घाबरतोय आपण! त्यांना तिथे बळजबरीने कोंडलेलं होतं पण आपलं काय? शेवटची काही वर्षे, दिवस हातात असताना ज्या गोष्टींचा रिग्रेट वाटेल त्या आताच का करू नये? आनंदावर सध्या तरी कुठला टॅक्स लागलेला नाही. निदान तोपर्यंत तरी जगून घ्यायला काय हरकत आहे. शेवटी काय तर एक शायर म्हणतो तसं…
मैं सोचता हूँ बहुत ज़िंदगी के बारे में
ये जिंदगी भी मुझे सोच कर न रह जाए
त्यापूर्वीच… लेट्स स्टार्ट टू लिव्ह!

योगिता पाटील 
                                                                                                                                                                                              9604924158