नंदुरबार : पत्नीला पळविल्याच्या संशयावरून प्रौढाचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा शहादा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. खटल्यात फिर्यादी, पंच व इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली.
शहादा तालुक्यातील लंगडीभवानी येथील रहिवासी सायसिंग ऊर्फ सायनाब आपसिंग पावरा याची पत्नी तेलीबाई ही माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून सायसिंग पावराची मानसिकता बिघडली. तो गावातील प्रत्येक व्यक्तीला माझी पत्नी कुठे आहे? असे विचारून तिला आणून द्या, असे सांगत लोकांवर त्याने दगडफेक केली होती. तो गावात हाती दांडके घेऊन फिरत होता. त्याच्या पत्नीला कोणीतरी पळवून लावले असावे, असा संशय घेत असे.
गावातील बालीबाई पावराच्या घराजवळच तो राहत असे. १३ एप्रिल २०१७ रोजी बालीबाई पावरा व तिचा पती जसा शेधा पावरा हे त्यांच्या घराशेजारील गोठ्यात झोपलेले असताना, पहाटे पाचच्या सुमारास जसा शेधा पावरा यांचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. त्या वेळी बालीबाई दचकून उठल्या. त्यांनी बाजूच्या खाटेवर पाहिले असता सायसिंग पावरा हा त्याच्या पत्नीला कोणीतरी पळवून लावले असल्याच्या कारणातून त्याने वेडाच्या भरात लाकडी दांडक्याने जसा शेधा पावरा यांना त्यांच्या डोक्यात जोरजोराने मारहाण करून त्यांना ठार मारले होते. त्यावरून शहादा येथील पोलीस ठाण्यात बालीबाई पावरा हिच्या फिर्यादीवरून संशयित सायसिंग पावराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होता.
गुन्ह्याचा तपास शहादा पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक डी. जे. बडगुजर यांनी स्वतःकडे घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित सायसिंग पावराविरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्याअन्वये गुन्हा सिद्ध झाल्याने सायसिंग ऊर्फ सायनाब आपसिंग पावरा (वय ४५, रा. लंगडीभवानी, ता. शहादा, जि. नंदुरबार) यास शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांनी दोषी ठरवत आरोपीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. स्वर्णसिंह ए. गिरासे यांनी काम पाहिले आहे.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी सागर नांद्रे, पैरवी अंमलदार हवालदार गणेश सावळे, राजेंद्र गावित, पोलीस शिपाई देविदास सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले आहे. गुन्ह्यातील तपासाधिकारी व त्यांचे पथक तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्तांचा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी गौरव केला.