मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; अविनाश जाधव संशयाच्या फेऱ्यात, पदाचा दिला तडकाफडकी राजीनामा

पालघर :  जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनसे पालघर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे व त्यांच्या भावावर धारदार शस्त्राने वार करत हल्ला केल्याची घटना घडली आहे. मनसेचे अविनाश जाधव यांनी ही मारहाण केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांनी केला आहे.

पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली होती. निवडणुकीमध्ये पक्षाकडून पुरवण्यात आलेली आर्थिक मदत जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून मिळाली नसल्याची तक्रार बैठकीत पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली.

त्याचाच राग मनात धरून अविनाश जाधव यांच्यासोबत असलेल्या १५ ते २० जणांनी सायंकाळी सातच्या सुमारास पाम येथील कार्यालयात घुसून समीर मोरे यांना मारहाण केली होती. तर त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावरही धारधार शस्त्राने वार केले. त्यांना उपचारासाठी बोईसर येथील शगुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

पालघर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी रविवारी राज ठाकरेंची भेट घेऊन पराभवाची कारणं सांगितली. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यानंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली असल्याची देखील माहिती आहे. याचाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता मनसे अध्यक्ष कोणते पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी विधानसभेत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहित अविनाश जाधव यांनी काल ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.