Literature Summit : मराठी समृद्ध करण्यामध्ये सामान्य माणसाचा वाटा महत्वाचा : धनंजय गुदासुरकर

Literature Summit :  मराठीला आपण जगविण्याची गरज नाही , आपल्या जगण्यासाठी मराठी जगली पाहिजे हा दृष्टीकोन आपण स्विकारला पाहिजे,  मराठीला समृद्ध करण्यात सामान्य माणूसच   महत्वाचा आहे”असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केली

पवन चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. पुरुषोत्तम नारखेडे स्मृती सतराव्या बहिणाई सोपानदेव खानदेश संमेलनाचे उद्घाटन गुडसूरकर यांच्या हस्ते दि .११ रोजी झाले . अध्यक्षस्थानी डॉ. संजीवकुमार सोनवणे होते .व्यासपिठावर माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे, जयश्रीताई महाजन, स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडे,  उपप्राचार्य वा. ना . आंधळे,जेष्ठ कवी शशिकांत  हिंगोणेकर, पुर्णिमा हुंडीवाले, बी. के चौधरी, डॉ . विलास नारखेडे , लिलाधर नारखेडे, रघुनाथ राणे, प्रतिभा खडके उपस्थित होते .  प्रा संध्या महाजन  यांनी प्रास्तविक केले .

 

“बोलीभाषेत समाजाच्या संस्कृतीचे अंग  असते, संस्कृती ही समाजाचा अस्मिता  असते, त्यासाठी बोलीभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे ” असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ . संजीवकुमार सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले .  “बोलीभाषेचा शास्रीय अभ्यास कठीण असला तरी तो आवश्यक असल्याचे डॉ. सोनवणे म्हणाले . बोलीभाषेतून गांभिर्याने लेखन करण्याची गरज व्यक्त करून वाचनसंस्कृतीबाबत गळे काढून न रडता त्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली . माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी साहित्यिकांनी एकत्र येऊन साहित्य क्षेत्रातील विषयांवर चर्चा करण्याची गरज प्रतिपादन केली .

 

प्रारंभी ग्रंथदिंडी काढण्यात आली . ज्योती राणे यांनी सुत्रसंचालन तर प्रा. संध्या महाजन यांनी आभार मानले .