जिल्ह्यात शीतलहर: विकारांपासून पशुधनाचा बचाव करा, पशुसवंर्धन विभागाचे आवाहन

तरुण भारत लाईव्ह ।१४ जानेवारी २०२३। राज्यासह जिल्ह्यात पशुधनावरील आलेल्या लम्पी आजाराचे संक्रमण कमी झाले असतानाच उत्तर महाराष्ट्रात शीतलहरी वाढल्या आहेत. त्यामुळे दुभत्या तसेच अन्य प्राणी पशुधनामध्ये आजार वाढण्याची शक्यता आहे. यासाठी दुग्धोत्पादन देणार्‍या तसेच शेतीकामासाठी उपयुक्त पशुधनासह पाळीव प्राण्यांना श्वसनविकार, सांधेदुखीसारखे आजार बळावू शकतात. शीतलहरींच्या परिणामांपासून प्राण्यांच्या बचावासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे आवाहन पशुसवंर्धन विभाग अधिकार्‍यांनी केले आहेत.

राज्यासह उत्तर महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यातदेखील सद्य:स्थितीत शीतलहरीचा जोर आहे. दिवसाचे तापमान 25 ते 27 तर रात्रीचे 5 ते 8 अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे हवामानात बदल झाला असून या बदलत्या हवामानाचा दुग्धोत्पादन तसेच शेतीपयोगी पशुधनावर परिणाम होण्याचा धोका आहे.
शीतलहरींमुळे पाळीव तसेच शेतीपयोगी पशुधनामध्ये हायपोथर्मिया, फ्रास्ट बाईट, भूक मंदावणे, मोठ्या पशुधनात सांधेदुखी, कुत्र्यांच्या पिलात खोकला, श्वसनविकार यासारखे आजार बळविण्याची शक्यता आहे. त्यानुसार जिल्हा परिषद पशुसवंर्धन विभागातर्फे पाळीव तसेच अन्य पशुधनाची काळजी घेण्यासंदर्भात उपाययोजना राबविण्याचे निर्देश तालुकास्तरावर दिले असल्याची माहिती जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ.एस.व्ही. शिसोदे यांनी दिली.

शीतलहरी प्रकोपात हे करा

स्थानिक हवामान अंदाजाची माहिती अद्ययावत ठेवावी, पशुधनाचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी करून ठेवावी, थंड वार्‍यापासून, कडाक्याची थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार निवारा, पशुधनाच्या अंगावर गोणपाट बांधावे, निवार्‍यात कृत्रिम प्रकाश व उष्णता पुरविण्याची व्यवस्था करावी, पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा, मोठ्या तसेच लहान वासरांना धान्याची भरड, पेंड व गूळ अथवा गुळपाणी द्यावे. पशुसंवर्धन वैद्यकिय अधिकार्‍यांमार्फत पशुधनाच्या संवर्गानुसार जंत व कृमिनाशके देण्यात यावी, लाळ, खुरकत, घटसर्प, फर्‍या पीपीआर, आंत्रविषार रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून
घ्यावे.