तरुण भारत लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील लोककलावंत शासनाच्या कोविड आर्थिक मदत योजनेपासून वंचीत असून त्यांना या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी आज शुक्रवारी खान्देश लोककलावंत परिषदेने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. दरम्यान, पुढील ८ दिवसाच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा सनदशीर मार्गाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व लोककलावंत एकदिवसीय धरणे आंदोलन करतील असे, आवाहन खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी केले.
कोविड प्रादुर्भावाने हलाखीचे जिवन जगत असलेल्या लोककलावंताना शासनाने कोविड पॅकेज च्या माध्यमातून अर्थ सहाय करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन या संदर्भात २०२१ मध्ये शासन निंर्णय करण्यात आला. तथा या शासन निर्णयात कलावंताना अर्थ सहाय मिळ्ण्यासाठी अनेक त्रुटी असल्याने दि. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी या शासन निर्णयात काही बदल करून नव्याने शुद्धीपत्रक काढून कोरोना पार्श्वभूमीवर एकल लोककलावंताना अर्ज सादर करण्यासाठी दि. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी विविध दैनिका मधून जाहिरात प्रसिद्ध केली.
शासन निर्णय व प्रसिद्ध जाहिराती नुसार प्रत्येक जिल्ह्यातील एकल कलावंताना ते राहत असलेल्या तालुक्यातील तहसीलदाराकडे जिल्हाधिकारी यांच्या नावे जाहिरात प्रसिद्धीच्या पुढील एक महिन्याच्या कालावधीत अर्ज सादर करण्यात यावे असे जाहीर केले. उपरोक्त जाहिराती नुसार दि. 22 ऑक्टोबर २०२२ ते २२ नोव्हेंबर २०२२ असा एक महिन्याचा कालावधी निर्धारित करण्यात आला होता.
या जाहिराती नुसार जिल्ह्यातील अनेक एकल कलावंतानी संबंधित तहसील कार्यालयात जाऊन संबधित तहसीलदारांना अर्ज स्वीकारण्याची विनंती केली. तथा शासनाकडून तसेच जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासना कडून तहसिलदार यांना कुठलेच आदेश प्राप्त नसल्याने जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्या पैकी पाचोरा तालुका वगळता, १४ तालुक्यातील तहसील कार्यालयाने एकल कलावंतांचे अर्ज स्वीकारले नाही. अर्ज स्वीकारण्याच्या महिना भराच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ तालुक्यातील एकल कलावंतानी वारंवार अर्ज स्वीकारण्या बाबत विनंती करूनही संबंधित तहसील कार्यालयाकडून अर्ज स्वीकारले गेले नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या या असंवेदनशील कारभारामुळे १४ तालुक्यार्तील किमान ४०० ते ५०० कलावंत कोविड १९ च्या अर्थ सहाय योजने पासून वंचित राहणार आहे.
त्यामुळे आज शुक्रवारी खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या वतीने प्रशासन विभागाचे तहसिलदार सुरेश थोरात यांनी निवेदन स्वीकारले. प्रसंगी विविध लोककला प्रकारात कार्यरत एकल लोककलावंतानी आपल्या व्यथा मांडल्या. या प्रसंगी खान्देश लोककलावंत परिषदे चे यावल तालुका अध्यक्ष भिका धनगर, चाळीसगाव अध्यक्ष चे लिलाधर कारभारी, जळगाव तालुका प्रमुख अवधुत दलालसह परिषदेचे दुर्गेश अंबेकर, सचिन महाजन, सुदर्शन पाटील उपस्थित होते.
निवेदनात काय म्हटले आहे?
या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना कोविड १९ अर्थ सहाय योजने पासून जिल्ह्यातील एकल कलावंत वंचित राहू नये. याकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ मिळावी व या योजनेचा लाभ कलावंताना मिळावा या करिता कार्यप्रक्रिया जलद गतीने राबवावी तसेच पुढील८दिवसाच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा सनदशीर मार्गाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालया समोर कलावंतांचा आवाज शासना पर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हातील सर्व लोककलावंत एकदिवसीय धरणे आंदोलन करतील असे अवाहन खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी केले.