लोकनायक बापूजी अणे… एक प्रेरणास्रोत !

गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वर्षांमध्ये माननीय पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार देशातील हजारो ज्ञात स्वातंत्र्यसेनानींचा त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या गौरवानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या वर्षापासून देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत काल सुरू झाला चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी अवतरण झाल्याने साऱ्या देशात एक प्रकारचे अभूतपूर्व उत्साही वातावरण आहे, ही या अमृत कालाची शुभ सुरुवात आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्याचे कार्य मोदी सरकार सतत करत आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाचे योगदान जेवढे महत्त्वपूर्ण आहे तेवढेच विदर्भातील जंगल सत्याग्रहाचे महत्त्व आहे. या सत्याग्रहाचे प्रणेते म्हणून लोकनायक बापूजी अणे, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची नोंद इतिहासात कायम राहणार आहे. विदर्भाला समुद्रकिनारा लाभला नव्हता. परंतु विदर्भाचा बराचसा भूभाग जंगल क्षेत्राने व्यापला होता. बापूजींनी १९२६ सालापासून जंगल खात्याविरुद्ध लढा उभारला याचे कारण म्हणजे सरकारने बराचसा भाग राखीव अ वर्ग म्हणून घोषित केला. ज्यामुळे चराई क्षेत्राचा प्रश्न निर्माण झाला होता. या जुलमी आणि तुघलकी कायद्याविरुद्ध बापूजींनी संपूर्ण विदर्भात रान पेटवले आणि याची परिणती म्हणून जंगल सत्याग्रहाची सुरुवात झाली.

१९ जून १९३० रोजी वऱ्हाड प्रांतातील कायदेभंग मंडळाच्या वार कॅबिनेटची अकोला येथे सभा झाली व या सभेमध्ये जंगल सत्याग्रहींच्या पथकाचे नेतृत्व बापूजी अणे यांनी करावे असे ठरले व त्याप्रमाणे बापूजींच्या नेतृत्वाखाली दहा सत्याग्रहींची तुकडी पुसदकडे १० जुलै १९३० रोजी रवाना झाली. जेव्हा हे सत्याग्रही पूस नदीच्या पात्रात आले तेव्हा त्यांना निरोप देण्याकरिता हजारोच्या संख्येने जनता उपस्थित होती. तेव्हा जनतेतर्फे बापूजींना चांदीचा विळा भेट देण्यात आला. सकाळी दहा वाजता आपल्या दहा सहकाऱ्यांसोबत बापूजींनी गवत कापून कायदेभंग केला यालाच जंगल सत्याग्रह असे म्हटले गेले. सत्याग्रहींवर आयपीसीचे कलम ३७९ लावून अटक करण्यात आली. हे कलम एखाद्याने चोरी केले असता लावण्यात येते. अशा तऱ्हेने बापूजींना चोर ठरवून अटक करण्यात आली. या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल बापूजींना सहा महिने कारावासाची शिक्षा झाली. अशा तऱ्हेने जंगल सत्याग्रहाचे लोण विदर्भातील सर्व जिल्ह्यात पसरले. हजारो जंगल सत्याग्रहींनी जंगल सत्याग्रह केला. यातील प्रमुख सत्याग्रह १४ जुलै १९३० रोजी गणपतराव टिकेकर यांच्या नेतृत्वाखाली १७ सत्याग्रहींनी वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे, तर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नेतृत्वाखाली ११ सत्याग्रहींनी यवतमाळ जिल्ह्यातील करडगाव येथे ३० जुलै १९३० रोजी केला.

या जंगल सत्याग्रहांमध्ये अनेक नेत्यांनी ठिकठिकाणी भाग घेतला. यामध्ये धर्मवीर डॉ. मुंजे, माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार, माजी मंत्री शंकरराव गेडाम, वर्धेचे अप्पाजी जोशी, दादाराव परमार आदींनी देखील भाग घेतला होता. बापूजी विदर्भाचे थोर नेते होते. स्वातंत्र्यपूर्वकाळात १९१५ ते २० या दरम्यान लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, अ‍ॅनी बेझंट या नेतेमंडळींनी होमरूल चळवळ सुरू केली. या चळवळीमध्ये बापूजींनी स्वतःला झोकून दिले आणि अशा तऱ्हेने लोकमान्यांचे पट्टशिष्य व महाराष्ट्राचे प्रमुख नेते म्हणून ते पुढे आले. पुढे १९२० साली लोकमान्यांच्या निधनानंतर १९२० ते १९३० या कालखंडामध्ये त्यांनी मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, विठ्ठल भाई पटेल आदी नेत्यांसमवेत प्रति सहकार पक्ष स्थापन करून यांच्या असहकार चळवळीला निकराचा विरोध केला आणि एवढेच नव्हे तर बापूजींनी १९२० साली नागपूर येथे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात महात्मा गांधींच्या असहकारिता चळवळीबाबत मांडलेल्या ठरावाला कडाडून विरोध करण्याचे धाडस दाखवले. असे असले तरी पुढे त्यांनी गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाला संपूर्ण पाठींबा जाहीर केला. १९४३ मध्ये महात्मा गांधी यांनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर या उपोषणाला पाठींबा देण्याकरिता बापूजींनी कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. बापूजी काही दिवस राष्ट्रीय काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष झाले १९४३ ते १९४७ या कालखंडात त्यांनी सिलोन येथे भारताचे राजदूत म्हणून कार्य केले

१९४७ ते १९४८ या काळामध्ये घटना परिषदेचे सभासद देखील झाले. १९४८ ते ५२ पर्यंत त्यांनी बिहार राज्याचे राज्यपालपद भूषविले. आजही पाटण्यामध्ये त्यांच्या नावाचा अणे मार्ग प्रसिद्ध आहे. पुढे विदर्भाच्या प्रश्नांवर त्यांनी १९५९ मध्ये नागपूर-उमरेड मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लढवली व त्यामध्ये ते विजयी देखील झाले. दुसऱ्यांदा ते याच मतदारसंघांमध्ये विदर्भाच्या प्रश्नांवर निवडून आले. बापूजींची खरी ओळख एक महान स्वातंत्र्य सेनानी, जंगल सत्याग्रहाचा जनक म्हणून तर आहेच, पण याचबरोबर वेगळ्या विदर्भ राज्याचे स्वप्न पाहणारे व त्यासाठी आजीवन चळवळ करणारे आणि लक्षावधी विदर्भवादी कार्यकत्र्यांना प्रेरणा देणारी महान विभूती अशी राहील. जेव्हा केव्हा विदर्भ राज्याची निर्मिती होईल तेव्हा वेगळ्या विदर्भ राज्याचे प्रणेते लोकनायक बापूजी अणे अशी त्यांची इतिहासात नोंद होईल. योगायोग म्हणजे ज्या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला, त्यादिवशी म्हणजेच २६ जानेवारी १९६८ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण ही पदवी बहाल केली. अशा या थोर विदर्भवादी सुपुत्राची तसेच जंगल सत्याग्रहाच्या प्रणेत्याचे पुण्यस्मरण त्यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी करू या आणि त्यांचे वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचे स्वप्न साकार करूया.