Lok Sabha Election Results : जळगाव, रावेरचा गड कोण सर करणार, महायुती की मविआ ?

Jalgaon / Raver Lok Sabha Election Results : मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले असून जळगाव / रावेर लोकसभा मतदार संघ महायुतीच्या उमेदवारांच्या विकास कामांच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब करणार ? की, महाविकास आघाडीच्या ‘संविधान बचाओ’ नाऱ्याला कौल देणार ? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

निकाल उद्या 4 जून रोजी घोषित होणार असला तरी दोन्ही युतीच्या समर्थकांनी मात्र जल्लोषाची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे. जवळपास सर्व एक्झिट पोल वरील अंदाज भाजप जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारे आहेत. दरम्यान, एक्झिट पोल असा असला तरी उद्या होणाऱ्या मतमोजणीत निकाल स्पष्ट होईल.

जळगावात कुणाचं पारडं जड होतं ?
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा जवळपास गेल्या 35 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. मधला एक वर्षाचा काळ सोडला तर आठ वेळा इथून भाजपचेच खासदार निवडून आलेले पाहायला मिळते. पण त्यापूर्वी देशभरातील इतर सगळ्याच मतदारसंघांप्रमाणं इथंही काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. काँग्रेसचे हरि विनायक पाटसकर हे या मतदारसंघाचे पहिले खासदार होते. त्यानंतर शिवराम राणे, एस.एस.सय्यद, कृष्णराव पाटील, यादव महाजन अशा काँग्रेसच्या अनेक खासदारांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. पण नंतर गुणवंतराव सरोदे यांनी हा मतदारसंघ भाजपला मिळवून दिला. त्यानंतर यशवंत महाजन, हरिभाऊ जावळे आणि ए. टी. पाटील यांनी भक्कमपणे धुरा सांभाळत याठिकाणचा भाजपचा बोलबाला कायम ठेवला. तर गेल्यावेळी उन्मेष पाटील याठिकाणी भाजपकडून निवडून आले होते.

२०१९ ची परिस्थिती
१ ) उन्मेष पाटील, भाजप – 713874
2) गुलाबराव देबकर, राष्ट्रवादी काँग्रेस – 302257
3) राहुल बनसोडे, बहुजन समाज पार्टी – 3428
4) ईश्वर मोरे, बहुजन मुक्ती पार्टी – 1262
5) अंजली बाविस्कर, वंचित बहुजन आघाडी – 37366
6) संत श्री बाबा महाराज महाहंसाजी, हिंदुस्थान निर्माण दल – 1295
7) मोहन बिऱ्हाडे, राष्ट्रीय समाजवादी पार्टी – 670
8) शरद भामरे, राष्ट्रीय जनशक्ती पार्टी – 817
9) अनंत महाजन, अपक्ष – 6562
10) ओंकार जाधव, अपक्ष – 3144
11) मुकेश कुरील, अपक्ष – 1383
12) ललित शर्मा, अपक्ष – 1108
13) सुभाष खैरनार, अपक्ष – 1629
14) रुपेश संचेती, अपक्ष – 3150

रावेरमध्ये कुणाचं पारडं जड होतं ?
रावेरमध्ये 2009 मध्ये भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी निवडणूक जिंकली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवार बदलून रक्षा खडसे यांना तिकीट दिले. 2014 मध्ये देशभरात मोदींची लाट असताना भाजपने ही जागा सहज जिंकत रक्षा खडसे खासदार झाल्या. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनीष जैन यांचा 3,18,060 मतांनी पराभव करत रक्षा खडसे विजयी झाल्या. यानंतर 2019 मध्ये भाजपने पुन्हा एकदा खडसे यांना उमेदवारी दिली. खडसे पुन्हा एकदा विजयी होऊन खासदार झाल्या. काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास वासुदेव पाटील दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 3,19,504 मते मिळाली होती.

२०१९ ची परिस्थिती
1) रक्षा खडसे, भाजप – 655386
2) डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस – 319504
3) डॉ. योगेंद्र कोलते, बहुजन समाज पार्टी – 5705
4) अजित तडवी, राष्ट्रीय आम जन सेवा पार्टी – 1425
5) रोहिदास अडकमोल, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया – 1679
6) नितीन कांडेलकर, वंचित बहुजन आघाडी – 88365
7) मधुकर पाटील, हिंदुस्थान जनता पार्टी – 1607
8) रोशन अली, इंडियन युनियन मुस्लिम लीग – 1103
9) गौरव सुरवाडे, अपक्ष – 985
10) विजय तंवर, अपक्ष – 1141
11) नजमीन शेख, अपक्ष – 2581
12) डी.डी. वाणी, अपक्ष – 4274

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान पार पडले. जळगाव लोकसभा मतदार संघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, एरंडोल, अमळनेर, पाचोरा आणि चाळीसगाव असे सहा तर रावेर मध्ये रावेर, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर आणि भुसावळ अशा सहा मतदार संघात मतदानप्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. आता 4 जून रोजी सकाळी शासकिय धान्य गोदाम परिसरात मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकी 14 टेबलवर 26 फेऱ्या होतील. तर रावेर मध्ये 1904 बुथवरील 23 राउंड 4 मतदार संघासाठी तर मलकापूरसाठी 22 आणि जामनेरसाठी सर्वात जास्त 24 अशा फेऱ्या होतील.

मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक व मदतनीस म्हणून 14 अधिकारी, 14 रो अधिकारी तर रो अधिकाऱ्यांना सहायक व नियंत्रणासाठी 14 कर्मचारी नियुक्त केले आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 15 पथक प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना सहाय्यसाठी असे 3 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मतमोजणीच्या सुरूवातीस टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असून त्यानंतर ईव्हीएम ची मतमोजणी केली जाणार आहेत. टपाली मतपत्रिका मोजणीसाठी जळगाव लोकसभेतसाठी 6 तर रावेर लोकसभेसाठी 4 टेबल लावण्यात आले आहेत. तर मतमोजणीसाठी देखील प्रत्येक टेबलवर कर्मचारी असतील. यात पर्यवेक्षक, सहाय्यक, मायक्रो ऑब्झर्वहर आणि एक शिपाई असे चार कर्मचारी असणार आहेत.

कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
मतमोजणी ठिकाणी कायदा सुव्यवस्था व शांततेसाठी कडेकोट सुरक्षा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी मतमोजणी कक्षात जाण्यासाठी अधिकृत ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मिडीया कक्ष व्यतिरिक्त अन्य मतमोजणी केंद्र कक्ष परिसरात मोबाईल वापरास पूर्णपणे बंदी करण्यात आली असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगीतले.

असा आहे पोलीस बंदोबस्त
पोलीस सुरक्षा यंत्रणेत पोलीस अधीक्षक, 4 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 2 पोलीस उपविभागीय अधिकारी, 4 पोलीस निरीक्षक, 22 पोलीस उपनिरीक्षक, 341 पोलीस कर्मचारी, 51 महिला पोलीस कर्मचारी, 2 आरसीपी प्लॅटून, 2 एसआरपी प्लॅटून, 2 सीआरपीएफ कंपनी असा बंदोबस्त जळगाव व रावेर लोकसभा मतमोजणी ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. तालुकास्तरावर देखील सुरक्षा व्यवस्था मतमोजणी सुरू असताना 4 जून रोजी दरम्यान जिल्ह्यात संवेदनशील गावांमध्ये तसेच स्थानिक ठिकाणावर देखील कायदा सुव्यवस्थेसाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रॅली काढण्यास बंदी मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना वा कार्यकर्ते प्रतिधिनीना कोणत्याही प्रकारची रॅली वा मिरवणूक काढता येणार नाही. मात्र 6 जून नंतर रितसर परवानगी घेतल्यानंतरच मिरवणूक वा रॅली काढता येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले.