जळगाव : जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मंगळवार, 4 जून, रोजी सकाळी 8 वाजेपासून शासकीय गोदाम, येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. दरम्यान, मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना वा कार्यकर्ते प्रतिधिनीना कोणत्याही प्रकारची रॅली वा मिरवणूक काढता येणार नाही. मात्र 6 जून नंतर रितसर परवानगी घेतल्यानंतरच मिरवणूक वा रॅली काढता येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगीतले.
जळगाव येथे 4 जून रोजी सकाळी शासकिय धान्य गोदाम परिसरात मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकी 14 टेबलवर 26 फेऱ्या होतील. तर रावेर मध्ये 1904 बुथवरील 23 राउंड 4 मतदार संघासाठी तर मलकापूरसाठी 22 आणि जामनेरसाठी सर्वात जास्त 24 अशा फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक व मदतनीस म्हणून 14 अधिकारी, 14 रो अधिकारी तर रो अधिकाऱ्यांना सहायक व नियंत्रणासाठी 14 कर्मचारी नियुक्त केले आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 15 पथक प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना सहाय्यसाठी असे 3 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
मतमोजणीच्या सुरूवातीस टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असून त्यानंतर ईव्हीएम ची मतमोजणी केली जाणार आहेत. टपाली मतपत्रिका मोजणीसाठी जळगाव लोकसभेतसाठी 6 तर रावेर लोकसभेसाठी 4 टेबल लावण्यात आले आहेत. तर मतमोजणीसाठी देखील प्रत्येक टेबलवर कर्मचारी असतील. यात पर्यवेक्षक, सहाय्यक, मायक्रो ऑब्झर्वहर आणि एक शिपाई असे चार कर्मचारी असणार आहेत.
कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
मतमोजणी ठिकाणी कायदा सुव्यवस्था व शांततेसाठी कडेकोट सुरक्षा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी मतमोजणी कक्षात जाण्यासाठी अधिकृत ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मिडीया कक्ष व्यतिरिक्त अन्य मतमोजणी केंद्र कक्ष परिसरात मोबाईल वापरास पूर्णपणे बंदी करण्यात आली असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगीतले.
असा आहे पोलीस बंदोबस्त
पोलीस सुरक्षा यंत्रणेत पोलीस अधीक्षक, 4 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 2 पोलीस उपविभागीय अधिकारी, 4 पोलीस निरीक्षक, 22 पोलीस उपनिरीक्षक, 341 पोलीस कर्मचारी, 51 महिला पोलीस कर्मचारी, 2 आरसीपी प्लॅटून, 2 एसआरपी प्लॅटून, 2 सीआरपीएफ कंपनी असा बंदोबस्त
जळगाव व रावेर लोकसभा मतमोजणी ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
तालुकास्तरावर देखील सुरक्षा व्यवस्था
मतमोजणी सुरू असताना 4 जून रोजी दरम्यान जिल्ह्यात संवेदनशील गावांमध्ये तसेच स्थानिक ठिकाणावर देखील कायदा सुव्यवस्थेसाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
40 जण तडीपार तर 20 जणांना जिल्हाबंदी
मतमोजणी काळात 40 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून 20 जणांना कलम 144 नुसार ताब्यात घेउन जिल्हाबंदीअंतर्गत जिल्ह्याच्या बाहेर रवानगी करण्यात आली असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगीतले.