---Advertisement---
आपल्याला ज्या आर्यजननीने जन्म दिला तिची ब्रिटिशांनी नागविलेली स्थिती ही लोकमान्यांच्या आंदोलनास प्रेरणादायक ठरली होती. त्यांच्या बालवयात गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या व्याख्यानांनी, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या स्वदेशाभिमानाने आणि स्वतःमधील प्रखर देशभक्तीच्या जाणिवेने त्यांना देशसेवेस आपली विद्वत्ता व आयुष्य खर्ची घालण्याची प्रेरणा मिळाली.
लोकमान्यांची स्मरणशक्ती प्रचंड व ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती दांडगी होती. म्हणूनच त्यांचे काट्यांनी भरलेले देशोद्धाराचे विश्वव्यापी प्रयत्न सुरू असताना त्यांनी इतिहास संशोधन, पंचांग संशोधन, वैद्यक संमेलन इत्यादी कार्य केले. त्यांची सर्वांत गोड कामगिरी ग्रंथ कर्तृत्व आणि सर्वांत भरीव व पोषक सर्वोपयोगी कामगिरी राजकीय चळवळ व लोकजागृती ही होय. ओरायन ऊर्फ अग्रहायणाचा विषय वेदाचा कालनिर्णय ठरविण्याचा होता. याच विषयावरून सुचलेला विषय जो आर्यांचे मूलस्थान, त्याचे विवरण त्यांनी आपल्या ‘आर्यलोकांचे मूलस्थान’ या ग्रंथात केले आहे. हे दोन्ही ग्रंथ त्यांच्या प्रगाढ संशोधन वृत्तीची साक्ष देतात. त्यांचा तिसरा व अत्यंत महत्त्वाचा व सर्वांना उपयोगी ग्रंथ म्हणजे भगवद्गीता रहस्य ऊर्फ कर्मयोगशास्त्र हा होय. त्याचा जरा तपशिलात जाऊन विचार करायला हवा.
‘स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे’ हे लोकमान्यांचे तत्त्व. त्याचा उच्चार करण्यास सुरुवातीस प्रतिबंध होता. त्यामुळेच ‘स्वराज्याचे’ स्थान त्यांच्या हृदयात खोल घट्ट जम बसवून होते. ते मिळविण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. परंतु स्वराज्य हे काही नुसत्या जपाने मिळत नाही. सर्व हिंदुस्थानच्या संयुक्त बळाची त्याला गरज होती आणि परिस्थिती तर विपरीत होती. सगळीकडे असंघटन, विस्कळीतपणा पसरला होता.
स्वराज्य नाहीसे झाल्यानंतर सर्व लोकांतील आत्मप्रत्यय नाहीसा झाला होता. वाघिणीचे दूध म्हणून ज्या इंग्रजी विद्येस म्हणतात त्या विद्येचा असह्य प्रकाशाने नवशिक्षित तरुण दीपून जाऊन भान विसरले होते आणि इंग्रजांनी जे इथे आणले तेच ज्ञान उत्तम आणि येथील विद्या टाकाऊ अशी त्यांची धारणा झाली होती. पाश्चात्त्यांच्या उद्योगप्रियतेने त्यांना भारून टाकले होते. अशा आणि इतर अनेक कारणांनी हिंदुस्थानातील लोकांनी आपले उद्योग, आपली विद्या आपले सर्वस्व कुठलाही प्रतिकार न करता ब्रिटिशांकडे गहाण टाकले होते.
सारा हिंदुस्थान कर्तव्यमूढ आणि अगतिक झाला होता. एकूणच या स्थितीची टिळकांना कीव येत होती. तेव्हा कर्तृत्वशक्तीतच आपला तरुणोपाय आहे त्यातच येथील लोकांची पर्यायाने देशाची उन्नती आहे हे त्यांच्या विचारांती लक्षात आले. त्यासाठी येथील मंडळींना यथोचित शिक्षित करून कार्यक्षम बनविणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. या धोरणाला अनुसरून त्यांनी विष्णुशास्त्री यांच्या न्यू इंग्लिश स्कुलात आपला शिरकाव करून घेतला आणि राष्ट्रोपयोगी शिक्षण देण्याचे काम सुरू केले व नंतर ही व्यवस्था नीट लागल्यावर ती दुसऱ्यावर सोपवून त्यांनी लोकांना आपल्या कर्तव्याची जाणीव व कार्यक्षमता जागरूक करण्याच्या हेतूने कर्मयोगशास्त्र नावाचा भगवद्गीतेवर ग्रंथ लिहून लोकार्पित केला.
त्या काळात या ग्रंथाने लोकजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात केले होते. महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना महाराष्ट्रीय संतांनी राष्ट्रजागृतीची मोठी कामगिरी केली असे म्हटले जाते. मात्र ही गोष्ट सर्वथा खरी नाही. ज्ञानोबांनी बहुतांशी (निवृत्तिपर) ज्ञानेश्वरीकडे, तुकोबांनी (भक्तिपर) पंढरीकडे बाकी बहुतेक संतांनी निवृत्तीकडेच लोकांचा ओघ वळविला होता. त्याचा परिणाम लोकांस दैववादी करण्याकडे झाला. त्यामुळे आपल्या ऐहिक कल्याणाकडे व हक्काकडे दुर्लक्ष झाले. नाही म्हणायला वामन पंडित, सद्गुरू श्रीपाद वल्लभआणि समर्थ रामदास यांनी लोकांना कर्मयोगाचा धडा दिला. परिणामी लोकांनी औरंगजेबास महाराष्ट्रात प्रवेश करू दिला नव्हता परंतु ही जागृती फार काळ टिकली नव्हती.
लोकांमध्ये पुन्हा राष्ट्रभक्तीचे तेज प्रज्वलित करण्याचे काम टिळकांच्या कर्मयोगशास्त्र या ग्रंथाने केले. भगवद्गीतेकडे अनेक विद्वानांनी वेगवेगळ्या दृष्टीने पाहिलेले आहे. कोणास ती ज्ञानपर दिसते तर कोणास तीत वासुदेव भक्ती, कोणास मोक्षदायिनी, तर कोणास पातंजल योगप्रदान वगैरे वगैरे. विविध विद्वानांना गीता अशी का वाटते याचे मुख्य कारण निरनिराळ्या आचार्यांच्या वेगवेगळ्या संप्रदायाच्या गीतेवरील भाष्य व टीकालेखनात आहे असे टिळकांना वाटत होते. विद्वानांनी गीतेवर प्रकट केलेली विविध मते विचारात घेतल्याने बुद्धी भ्रमित होऊन गोंधळ होण्याचा संभव असल्याने ही सारी मते बाजूला करून मूळ गीतेवरच चिंतन केल्याने आपले म्हणणे लोकांपर्यंत थेट पोहोचविता येईल असे त्यांना वाटले.
त्यामुळे गीता ऐकल्यानंतर अर्जुनावर जसा कर्तव्यकठोर होण्याचा परिणाम झाला तसाच तो येथील लोकांवर स्वच्छपणे साधता येईल हाच गीतेचा खरा समजण्याचा राजमार्ग आहे असे टिळकांचे मत बनले. टिळकांनी गीतेचा अर्थ समजण्याकरिता वयाच्या १६ व्या वर्षापासून प्रयत्न सुरू केले होते. अखेर मंडालेच्या एकांतवासात त्यांच्या तपश्चर्या पूर्ण होऊन त्यास खऱ्या अर्थाचा साक्षात्कार झाला. उठा जागे व्हा आणि (भगवंताने दिलेले) हे ‘वर’ समजून घ्या असा सल्ला त्यांनी होतकरू जनतेला दिला. यातच उन्नतीचे, मोक्षाचे, स्वराज्याचे बीज आहे आणि हेच गीतेतील रहस्य आहे. भगवान श्रीकृष्णाचे आश्वासन आहे हे त्यांनी जनतेस पटवून दिले.
देशकालानुसार अंगीकृत केलेले कर्म प्रत्येकाने केलेच पाहिजे असे गीतारहस्यात सांगितले आहे. ते निष्काम असल्याने चित्तशुद्धीचे मोठे साधन आहे. ज्ञान, संन्यास, कर्म व भक्ती यांच्या योग्य मिलापाने इहलोकी आयुष्यात कोणता मार्ग स्वीकारायचा त्याप्रमाणे सर्व पंथांच्या लोकांचा संग्रह करून आपल्या कार्यकर्तृत्वाची वाट दाखवून आपल्यातील निष्क्रियतेला पूर्णविराम देण्यास बाध्य करणे, त्यायोगे जनसमूहाची शक्ती एकवटून राष्ट्रकार्यास कामी लावणे हेच लोकमान्यांना सांगायचे होते. त्यांचा हाच उपदेश आपण आज आचरणात आणायला हवा.
डॉ. विलास चिंतामण देशपांडे – ९९६००३११४८