---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात सध्या लम्पी या संसर्गजन्य आजाराने पशुधनावर घाला घातला आहे. शेतीच्या कामांचा मोसम सुरू असताना जनावरांमध्ये या आजाराचा फैलाव होऊ लागल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे.
गत दोन महिन्यांपासून बोदवड तालुक्यात लम्पी प्रतिबंधक लसीकरण केवळ कागदोपत्री झाले असल्याची चर्चा असून, प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसून येत आहे. बोदवड शहरातील ललित सारवान यांच्या दीड वर्षाच्या वासराला लम्पीची लागण झाली होती. त्याच्या अंगावर पुरळ उठल्या आणि उपचार सुरू असतानाच ते दगावले. दुसरीकडे करंजी शिवारात पाच जनावरांना लम्पीची लागण झाली असून, यात गायी, म्हशी, बैल यांचा समावेश आहे.
तातडीने लसीकरण करण्याची आवश्यकता
बोदवड तालुक्यातील जनावरांना लम्पीची बाधा होत आहे. त्यामुळे या भागातील गुरांना तातडीने लसीकरणाची आवश्यकता असूनही अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे लसीकरण मोहीम राबविण्यास अडथळे येण्याची शक्यता आहे.
एकाच अधिकाऱ्यावर साऱ्या तालुक्याचा भार
बोदवड व एणगाव या गावांमध्ये लम्पीची जनावरे आढळली आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही ठिकाणी पशुसंवर्धन अधिकारी वर्ग १ चे पद रिक्त असून, प्रभारी म्हणून जामठी येथील अधिकारी रेखा पांचाळ या कार्यरत आहेत. त्यांच्यावर एकाच वेळी बोदवड, व इतर भागांचा अतिरिक्त कार्यभार आहे. सहायक पशुसंवर्धन अधिकारी हे पदही रिक्त असल्याने अडथळे येत आहेत.