लम्पी नियंत्रणात: पशुधन आठवडे बाजार पूर्ववत

 

तरुण भारत लाईव्ह ।१० जानेवारी २०२३। लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या आठवडे बाजारावर ऑगस्ट 2020 पासून बंदी होती. लसीकरणासह अन्य अटींचे पालन करण्याच्या हमीवर पशुधनाच्या आठवडे बाजारावरील निर्बंध हटविण्यात आले असून सोमवार 9 जानेवारीपासून ते पूर्ववत सुरू करण्यात येत असल्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यांतर्गत वाहतूक करावयाच्या गुरांचे लम्पी चर्मरोगाकरिता 28 दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. वाहतूक करावयाच्या पशुधनाची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर असणे, इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. वाहतूक करताना विहित प्रपत्रामधील आरोग्य दाखला आणि स्वास्थ्य प्रमाणपत्र वाहनचालकाकडे तसेच पशुपालकाकडे असणे आवश्यक आहे. पशुधनाचा आठवडे बाजार भरविण्यापूर्वी व नंतर संपूर्ण परिसरात जंतूनाशक व कीटकनाशक औषधाची फवारणी आयोजकांनी करणे बंधनकारक आहे.

आठवडे बाजार परिसरात फक्त कानात टॅग असलेल्या पशुधनास प्रवेश देणे बंधनकारक आहे. खरेदी-विक्रीसाठी आलेल्या पशुधनाची यादी संबंधित पशुपालकांच्या नावासहीत (टॅग नंबरसह) पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांना त्याच दिवशी देणे बंधनकारक आहे.
संक्रमित असलेल्या व नसलेल्या क्षेत्रातून पशुधनाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पशुधन खरेदी विक्रीसाठी आठवडे बाजार पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. लम्पी संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणासह कानात ओळख म्हणून टॅग असलेलेच पशुधनच शेतकर्‍यांनी आठवडे बाजारात आणावे. शेतकरी, व्यापार्‍यांनी शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. असे आवाहन जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव तसेच प्रशासक यांनी केले आहे.

लसीकरणासह टॅग असलेल्या पशुधनालाच परवानगी 

लम्पी संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांमुळे जिल्ह्यात पशुधन खरेदी-विक्री आठवडे बाजारांवर गेल्या काही महिन्यांपासून निर्बंध होते. संसर्ग कमी झाल्याने तसेच संपूर्ण पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेता गुरांच्या आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. यात लसीकरण झालेल्या तसेच कानात टॅग नंबर असलेल्या पशुधनालाच खरेदी विक्रीसाठी गुरांच्या आठवडे बाजारात आणावे. लम्पी स्किनबाधित पशुधन बाजारात आणू नये.
-अमन मित्तल, जिल्हाधिकारी, जळगाव.

1 हजार 859 पशुमालकांना मदतीचा लाभ
लम्पी स्किन प्रादुर्भावामुळ बाधित पशुधनापैकी 28 हजार 400 पशुधन लसीकरण आणि तालुका तसेच ग्रामीण स्तरावर असलेल्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून करण्यात आलेल्या उपचाराअंती पूर्णतः बरे झाले आहे. दरम्यान, 1 हजार 900 मृत पशुधनापोटी 1 हजार 859 पशुमालकांच्या संबंधीत बँक खात्यावर 4 कोटी 78 लाख रुपये नुकसानीपोटी मदत शासनस्तरावरून जमा करण्यात आली आहे.
                                                                                                      -डॉ.श्यामकांत पाटील, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, जळगाव.

उपचाराअंती 24 हजार 400 पशुधन लम्पी स्किन संसर्गमुक्त

जिल्ह्यात 8 ते 10 लाख गोवंश, म्हैसवर्गीय तसेच शेळया मेंढ्यांसह अन्य पशुधन यात असून सुमारे 4 लाख गोवंशीय पशुधनाचे लसीकरण संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात पूर्ण करण्यात आले आहे. तसेच लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीमुळे लम्पी संसर्ग प्रादूर्भाव आटोक्यात आला आहे. आतापर्यंत संसर्गबाधित 28 हजार 400 पशुधन उपचाराअंती पूर्णतः बरे झाले आहे. तर अजूनही सुमारे 900 पशुधनावर उपचार केले जात आहेत.