Jalgaon Crime News : ‘शेअर मार्केट’मध्ये नफ्याचे आमिष, एक कोटी सहा लाखांचा गंडा

जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून प्रचंड नफा कमविण्याचे अमिष दाखवित सायबर ठगांनी येथील ४२ वर्षीय गृहस्थाला ऑनलाईन एक कोटी सहा लाख पाच हजार ९८५ रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी शुक्रवार, २७ रोजी सायबर पोलीस ठाण्यात सायबर ठगांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

४२ वर्षीय गृहस्थ मूळ भोपाळ मध्यप्रदेश येथील रहिवासी असून ते सध्या भोईटनगर परिसरात वास्तव्यास आहेत. १८ जुलै २०२४ ते २६ सप्टेंबरपावेतो वेळोवेळी अंकित अग्रवाल तसेच मीरा यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास प्रचंड नफा कमवा, असे सांगत त्यांचा ठगांनी विश्वास संपादन केला.

अलंकीत लिमीटेड सिक्युरीटी स्टॉक लींग ग्रॅप, एफ ६०८ अलंकीत सेक्युरिटी कस्टमर सर्व्हस टीम यामध्ये त्यांना अॅड केले. त्यानंतर सायबर ठगांनी तक्रारदार गृहस्थाला एक लिंक पाठविली. अलंकीत नावाचे अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.

आता पैशांची गुंतवणूक करा
आता गुंतवणूक करुन शेअर मार्केटमधून मोठ नफा कमवा, असे अमिष सायबर ठगांनी दाखविले. सुरुवातीला तक्रारदार गृहस्थाने भरलेल्या रक्कमेवर त्यांना ३,५०० रुपयांचा नफा झाल्याची थाप ठगांनी मारली. त्यानंतर त्यांच्याकडून १, ०६, ०५,९८५ रुपये ऑनलाईन नेटबॅकिंगव्दारे वेगवेगळ्या बँक खात्यात रक्कमा ठगानी स्वीकारल्या. मात्र तक्रारदार यांना कोणताही परतावा दिला नाही.

आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी संपर्क साधला असता ठगांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर तक्रारदार यांनी सायबर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणी संशयित ठगांविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. तपास पोनि नीलेश गायकवाड हे करीत आहेत.