प्रा. डॉ. अरुणा धाडे
विदर्भ राजा भीष्मकने आपली सुकन्या रुक्मणीचा विवाह, तिचा भाऊ रुक्मी याचा मित्र आणि छेदिचा राजा शिशुपाल याच्याशी ठरवला होता. पण रुक्मणीचा ह्या विवाहाला विरोध होता कारण तिला विवाह फक्त श्रीकृष्णाशीच करायचा होता. श्रीकृष्णाच्या शौर्य आणि धैर्याच्या गोष्टी ऐकून ती त्याच्या प्रेमात पडली होती. रुक्मणीने श्रीकृष्णाला आपला अनुराग व्यक्त करणारं पत्र पाठवलं. पत्रातील आशयानुसार एक अपहरणाची योजना आखण्यात आली. रुक्मणी तिच्यावरचा कडा पहारा चुकवत ठरलेल्या वेळी मंदिरी आली. श्रीकृष्ण काही यादवांसह मंदिरात दाखल झाले. हाती वरमाला घेत श्रीकृष्णाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुक्मणीचा, श्रीकृष्णाने सहर्ष स्वीकार केला आणि ठरल्याप्रमाणे रुक्मणी आणि श्रीकृष्णाचा त्याच मंदिरात विवाह संपन्न झाला. ही गोष्ट रुक्मीला कळली. त्याचा अर्थातच ह्या लग्नाला विरोध होता. दोघांच्यात युद्ध झाले. श्रीकृष्णाने रुक्मीला पराजित केले आणि रुक्मणीचे अपहरण करत मथुरेकडे प्रस्थान केले. अशी ही महाभारतकालीन रोमांचकारी प्रेमकथा आणि त्या प्रेमकथेची परिणीती भगवान श्रीकृष्णाच्या विवाहाने संपन्न व्हावी ह्या सारखा सुंदर दैवयोग तो काय ! त्या उत्कट घटनेचे साक्षीदार जे मंदिर होते ते आजच्या विदर्भातील अमरावतीचे अंबादेवीचे मंदिर आहे. असं म्हणतात कि अंबादेवीला साकडे घालून रुक्मणीने इच्छित वराचं दान मागितलं होत आणि प्रकटलेल्या अंबादेवीने रुक्मणीला फुलांची वरमाला दिली होती. तीच वरमाला श्रीकृष्णाला अर्पित करत रुक्मणी विवाहबंधात अडकली होती. ह्या कथेवरून मंदिराचे प्राचीनत्व लक्षात येते. इतक्या कालावधीनंतर आजही हे देवस्थान भक्तीच्या श्रद्धेच्या उत्सवात तसंच टिकून आहे.
महाभारत कालीन संदर्भानंतर मंदिराचा उल्लेख मिळतो तो सरळ 1500 च्या कालखंडात जेव्हा वऱ्हाडवर मोगलानी आक्रमण करत अंबादेवी मंदिर उद्ध्वस्त केले होते मात्र आतील गाभारा व अंबेची मूर्ती सुखरूप राहिली होती. पुढे 1660 च्या सुमारास श्रीजनार्दन स्वामींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला असा उल्लेख आहे. विशेष म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचेही श्रीअंबादेवी मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान लाभलेले आहे.
विदर्भाची कुलस्वामिनी कुलदैवत म्हणून अंबाबाई आणि एकविरा देवी यांना मानलं जातं त्याशिवाय हे देवस्थान भारतातील एक प्राचीन शक्तीपिठही आहे.
पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार रोज पहाटेच्या वेळी भूपाळी सनई-चौघड्याच्या सुस्वरात मंदिराचं प्रवेशद्वार उघडलं जातं. समोरच काळ्या रंगाची, वालुका पाषाणाची श्रीअंबादेवी स्वयंभू मूर्ती असते. अर्धोन्मिलित दोन्ही नेत्र, शांत गंभीर ध्यानस्थ पद्मासन मुद्रेत पूर्वाभिमुख आसनावर विराजमान असते. रोज पंचामृतादि स्नान केल्यानंतर देवीचा मळवट भरला जातो. मुखवटा चढविला जातो. कपाळावर कुंकुम, पायात वाळ्या, कानात बुगडी, नाकात नथ, गळ्यात ठुशी, सुवर्णाच्या सऱ्या, कमरेत कमरपट्टा अशा सुवर्णालंकार आणि जडजवाहिरींसह देवीला नऊवारी नेसवली जाते. विविध पुष्पांची आरास केली जाते. अशा देखण्या श्रुंगारात देवी प्रसन्न वाटते. साक्षात समोर असल्याचा आभास होतो.
अंबादेवी मंदिराच्या दक्षिण बाजूला एकविरा देवीचे प्रशस्त मंदिर आहे. अंबादेवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक एकविरादेवीचेही दर्शन घेतात. एकविरेला मोठी देवी व अंबादेवीला लहानदेवी म्हणण्याचा प्रघात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आईभवानीचे निस्सीम उपासक होते. श्रीइच्छेने स्थापित होणाऱ्या हिंदवी स्वराज्याला धर्माचे अधिष्ठान असावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या ‘राज्यभिषेकाची’ निमंत्रण पत्रिका अंबादेवीलाही पाठवल्याची उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यासहित इतिहासात नोंद आहे.