Ramayana-Mahabharata भारत देश आणि ‘महाभारत’ या महाकाव्याचा जन्मापासूनचा संबंध आहे. ‘भारत’ हे नाव शकुंतला आणि दुष्यंत यांचा पुत्र ‘भरत’ याच्या नावाने पडले आहे. द्वापारयुगात याच भरतवंशीयांचे राज्य हस्तिनापूर येथे होते. त्याचा एक समृद्ध इतिहास आहे. दिव्य-भव्य अशी महान परंपरा आहे. त्याचा इतिहास ‘महाभारत’ या काव्याच्या रूपाने महर्षी व्यासांनी सुमारे एक लक्ष श्लोकसंख्येत लिहिला आहे. महाभारत हे विकसित होत गेलेले ‘जय’ नावाच्या इतिहासाच्या व्यास लिखित इतिहासाचे भव्य-दिव्य स्वरूप आहे. हा इतिहास सौतीने ‘महाभारत’ स्वरूपात विकसित करून पुनर्लिखित केला. वैशंपायांनी तो जनमेजयाला सांगितला आणि परंपरेने महाकाव्य रूपाने भरताचे वारसदार असलेल्या भारतीयांना तो प्राप्त झाला आहे.
Ramayana-Mahabharata रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये म्हणजे भारतवासीयांना कोणत्याही कालखंडात युगानुयुगे, जीवनतत्त्वज्ञान आणि व्यवहार या बाबतीत प्रखर मार्गदर्शन करणारे दीपस्तंभच आहेत. महर्षी वाल्मीकिंच्या दिव्यदर्शी आणि तप:पूत प्रज्ञेतून प्रकट झालेले ‘रामायण’ हे महाकाव्य म्हणजे मानवी जीवनात सहजपणे पार पाडाव्या लागणाऱ्या सर्व भूमिकांचा म्हणजे पुत्र, बंधू, सखा, मित्र, राजा, अजिंक्य योद्धा, पती, लोककल्याणकारी, प्रजावत्सल राजा या संबंधातील व्यवहारांचे, मर्यादांचे अंतिम आणि सर्वश्रेष्ठ आदर्श मापदंड प्रस्थापित करणारा मर्यादा पुरुषोतमाचे प्रतीक असलेल्या श्रीप्रभु रामचंद्रांचे महन्मंगल चरित्र! तसेच मानवी जीवनातील संस्कृतीतील शाश्वत जीवन मूल्यांचे पावित्र्याचे, मांगल्याचे माहेरघर असलेल्या मातृशक्तीला, आपल्या कामांधतेचे भक्ष्य करणाऱ्या त्रिलोकविजयी रावणशाहीला जी वृत्ती पुढे सुलतानशाहीच्या रूपाने अवतीर्ण झाली.
व्यासोच्छिष्टं जगत सर्वम् Ramayana-Mahabharata
‘रामायण’ हे महाकाव्य त्रेतायुगातील आहे. ‘महाभारत’ हा ग्रंथ द्वापार युगातील आहे, त्रेतायुगाच्या तुलनेत द्वापार युगातील मानवी जीवन हे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अतिशय जटिल, गुंतागुंतीचे, अनेक समस्यांनी ग्रस्त आणि त्रस्त झाले होते. त्यामुळे महाभारतात येणारे अनेक प्रश्न हे बहुआयामी असे आहेत. त्याचा परिणाम म्हणजे महाभारत हे महाकाव्य एक लक्ष श्लोकांचे आहे तर रामायण हे चोवीस हजार श्लोकांचे आहे. त्यांची रचना करणारे महाकवी ‘वाल्मीकि’ आणि ‘वेदव्यास’ हे दोघेही दिव्यदृष्टिसंपन्न आहेत. स्वत: तपश्चर्येने प्राप्त अनेक सिद्धी त्यांच्याजवळ तर होत्याच; पण ब्रह्मदेवाने ती दिव्यदृष्टी आशीर्वाद रूपाने महर्षी वाल्मीqकना देऊन रामायण ग्रंथ लिहिण्याचा आदेशच दिला होता. तोच प्रकार महाभारत ग्रंथाबाबत आहे. महर्षी व्यासांनी तर संजयला ‘दूरदर्शना’ची दिव्य दृष्टी प्रदान करून अंध असलेल्या धृतराष्ट्राला संपूर्ण महाभारत युद्धाचा तपशील (त्या काळचा लाईव्ह कास्ट) (व्हिडीओ) ऐकविला. त्यामुळे हे दोन्ही ग्रंथ प्रासादिक आहेत. वरद ग्रंथ आहेत. म्हणूनच वर्तमान काळातही बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात त्यातील अनेक क्षेत्रातील जीवनमूल्ये, जीवन सत्ये आजही ‘वृत्तीरूपेण’ आपल्याला अनुभवायला येतात.
Ramayana-Mahabharata म्हणूनच ‘व्यासोच्छिष्टं जगत सर्वम्’ असे म्हटले जाते, महाभारत म्हणजे अतिशय तरल, जटिल, भावनिक गुंतागुंतीच्या स्वरूपाच्या मानवी स्वभावाच्या विविध विकार, वासनांचे निखळ, पारदर्शी चित्रण करणारी एक अमर साहित्यकृती आहे. रामायण आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ हिंदू धर्म, हिंदू संस्कृती परंपरा, इतिहास, तत्त्वज्ञान या विविध विषयांवर समग्र, तपशीलवार दिशाबोध करणारे मार्गदर्शन तर करतातच; पण तरीही या दोन ग्रंथांमध्ये एक सूक्ष्म फरक आहे आणि तो दोन युगातील बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात आहे. दोन युगातील दिवसानुदिवस जीवनमूल्यांचा होणाऱ्या इतिहासाबद्दल आहे. व्यष्टी-समष्टी- धर्म-नीतिमूल्यांच्या ढासळत जाणाऱ्या गतिमानतेविषयीचा आहे. त्यातून व्यक्ती सुटलेली नाही, समाज सुटलेला नाही, राजयंत्रणा तर ‘राजा: कालस्य कारणम्’ या अराजकतेच्या भयावह उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. राज्य लोभामुळे भाऊ भावाचा वैरी झाला आहे. अशा जीवनमूल्यांच्या संघर्षातून यशस्वीपणे मार्ग कसा काढायचा, कोणती उपाययोजना करायची याचे वर्तमान युगातही विशेषतः भारताच्या अंतर्गत आणि बाह्य परिस्थितीतही उपयुक्त असलेले ज्ञान आजही आपल्याला महाभारत ग्रंथातून सहजपणे मिळू शकते.
Ramayana-Mahabharata धर्म, नीती, काव्य, भाषा सौंदर्य, राजनीती युद्धनीती, तत्त्वज्ञान, इतिहास या संबंधातील ज्ञानाचे अक्षय भांडार म्हणजे महाभारत! म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे महाभारत हा विश्वकोश आहे. प्राचीन आर्याचे जीवन आणि व्यावहारिक तत्त्वज्ञान यांचे उद्बोधक निवेदन आहे. मानवतेने अद्याप जिच्या साधनेसाठी तीव्र इच्छा बाळगावी आणि अविरत प्रयत्न करावेत, अशा उदात्त संस्कृतीचे चित्रण आहे. महाभारतकार चिंतामणराव वैद्य म्हणतात, महाभारतात जागोजागी जे व्यवहारज्ञान सांगितले आहे ते इतरत्र कोठेही सापडणार नाही. जगतात सर्वच मनुष्ये चांगली असू शकत नाही. कुटिलांची कारस्थाने ओळखून कशी हाणून पाडावी आणि आपली नीतिमत्ता राखूनही कुटिलांशी, शत्रूंशी कसे वागावे या विषयीचा ग्रंथ सर्वोत्तमातील उपदेश व मार्गदर्शन अतिशय मार्मिक आहे. अतिशय उच्चतम, आदर्श नीतितत्त्वांचा कलियुगातील व्यावहारिक चौकटीत देश, धर्म, युद्धप्रसंगात कसा कुशलतेने उपयोग करावा, याचे अचूक दर्शन घडविणारा हा ग्रंथ आहे. खोटं बोलू नये ‘सत्य ब्रूयात’, ‘न हि सत्यात्परो धर्म:’ सत्यासारखा धर्म नाही, सत्यभाषणाचे पुण्य अश्वमेधाहून जास्त आहे हे आदर्श तत्त्वज्ञान असले तरी कपटी आणि लबाड शत्रूशी धर्माच्या अंतिम यशासाठी ‘नरो वा कुंजरोवा’ असे मोघम, संदिग्ध, खोटे बोलण्याची लवचीकता कशी ठेवावी, हे मोलाचे मार्गदर्शन हा ग्रंथ अनेक जागी करतो. (उपोद्घात – म. भा. खंड १ ला)
Ramayana-Mahabharata इतिहासाच्या वाटचालीत महाभारताचा हा आदर्श, व्यवहाराचे हे संकेत आम्ही पाळले नाहीत, त्याचा दुष्परिणाम म्हणजे जगाच्या धकाधकीच्या मामल्यात आम्ही बावळट, मूर्ख ठरलो. शत्रु-मित्र विवेक पाळणे आम्हाला जमले नाही. सहस्रावधी वर्षांच्या खडतर वाटचालीतूनही आम्ही काही शिकलो नाही. ‘शत्रूला पाठ दाखविणार नाही’, ‘दिलेला शब्द मोडणार नाही’, ‘शरण आलेल्या शत्रूला मरण देणार नाही’ या सर्व भंपक सद्गुण विकृतींमुळे जिंकण्याची क्षमता असतानाही आम्ही पराभूत होऊन रानोमाळ भटकलो. धर्म, राष्ट्र, समाज यांना दुर्दिन आणले. ‘विषवल्ली ही मुळापासूनच उखडून फेकावी लागते, नाही तर तिला पालवी फुटून ती अधिक जोराने फोफावते’ हा निसर्गाचा चाणक्याने सांगितलेला राजनीतीतील शाश्वत सिद्धांत आम्ही दुर्लक्षित केला. त्यामुळे वैयक्तिक औदार्याच्या भरीस पडून पृथ्वीराजानी १७ वेळा ‘महंमद घोरी’ या विषारी वृक्षाकडे दुर्लक्ष केले; त्याचा भयानक परिणाम म्हणजे पुढील हजारो वर्षांमध्ये संपूर्ण भारत ‘हिरवा’ झाला. चितौडच्या सहस्रावधी हिंदू भगिनींचे जोहार संपन्न करण्याच्या तथाकथित उदात्ततेला आम्हीच कारणीभूत आहोत.
Ramayana-Mahabharata त्याच जीवघेण्या उदात्ततेचे आजचे बदललेले स्वरूप म्हणजे ‘तुष्टीकरण’ सेक्युलॅरिझम! ज्याचा ‘दृश्य’ परिणाम हिंदू अल्पसंख्य होण्यात आणि चक्रवर्ती राजा भरताच्या- ‘भारताचा’ भूगोल अधिकाधिक संकुचित होण्यात होऊ घातला आहे. या लेखाच्या निमित्ताने आपले राष्ट्र ज्या महान राजर्षीच्या नावाने ओळखले जाते त्याने पुढील पिढ्यांसाठी कोणता भौगोलिक वारसा ठेवला होता त्याचे मूळ भारतातील वर्णन पाहणे इष्ट राहील. वैशंपायन म्हणतात- हे जनमेजया! तुझ्या श्रेष्ठवंशाचा संस्थापक महाक्रमी दुष्यंताचा महापराक्रमी पुत्र ‘भरत’ हा आहे. या काळातील सर्व असुरी म्लेंच्छांपासून तो वाघ, सिंह या क्रूर प्राण्यांपर्यंत तो सर्वांचे ‘दमन’ करीत असे म्हणून त्याला ‘सर्वदमन’ असेही म्हणत. तो चारही समुद्रापर्यंत पसरलेल्या सर्व पृथ्वीचा स्वामी आणि रक्षणकर्ता होता. अशा विश्वविजेत्या, चक्रवर्ती महान राजाच्या नावाने स्थापन झालेल्या भारत देशाचा मी वारसदार. असे पूर्वज आम्हाला लाभले, हे आमचे भाग्य! आणि संपूर्ण पृथ्वी तर जाऊ द्या फक्त आसेतु हिमाचल हा भूभागही अखंडपणे ज्यांना सांभाळता येत नाही असे वारसदार मला लाभले, याची तक्रार चक्रवर्ती भरताने कोणाजवळ करायची?