तरुणांना मोठी संधी; जळगाव जिल्हा परिषदेत महाभरती

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : मिनी मंत्रालयात आगामी एप्रिल महिन्यात महाभरती भरती होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतच्या कामाला वेग दिला आहे. या विभागाकडून प्रत्येक विभागाला रिक्तपदे अंतिम करण्यासाठी बिंदू नामावली तपासणी करून ती मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून आणण्याचे आदेश देण्यात आले आहे.
राज्य शासनाकडून 80 टक्के रिक्त पदे भरती करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकार 75 हजार पदे भरणार असल्याचे सरकारने जाहीर केल्या नंतर प्रशासनाकडून त्या दृष्टीने तयारी करत आहे. जि.प.त साधारणत: 10 टक्के ग्रामपंचायतची पदे व अनुकंपाची पदे वगळता साधारणत: 50 टक्के पदे ही भरतीत भरली जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाची बिंदू नामावली तपासून ती मागासवर्गीय कक्षाकडून मजूर करून आणण्यासाठी 15 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना पत्र देण्यात आले आहे. मंजूर बिंदू नामावलीनंतर संवर्गनिहाय पदाचे आरक्षण निश्चित होणार आहे.

यंदा भरती प्रक्रिया निवड समितीमार्फत होणार असल्याने आरोग्य विभागाच्या भरतीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे. अन्य पदांच्या भरतीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली वेगळी समिती असणार आहे. या भरती प्रक्रियेत वाहनचालक व परिचरांची पदे भरली जाणार नाही. दरम्यान, भरती प्रक्रियेसाठी सामान्य प्रशासन विभागाने बिंदू नामावली प्रक्रियेला वेग दिला आहे.