मुंबई : “पश्चात्यांच्या सांस्कृतिक वर्चस्ववाद ही केवळ एक राजकीय कृती नसून आज तो व्यापक विषय झाला आहे. पूर्वी एखादा पंथ किंवा संप्रदाय यांना लक्ष्य करून त्यांच्यात चुकीचा इतिहास पसरवून आपले नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न होत होता. सध्या विज्ञान, इतिहास, संप्रदाय, जीवनशैली, मनोरंजन, मन अशा गोष्टीना लक्ष्य केलं जातय. मात्र विश्वाला पश्चात्यांच्या सांस्कृतिक वर्चस्ववादातून बाहेर पडावेच लागेल”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
विश्व अध्ययन केंद्र आयोजित लक्ष्मणराव भिडे स्मृती व्याख्यानमाला (पुष्प १७ वे) शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी पर्ल अकादमी, अंधेरी येथे संपन्न झाले. दरम्यान त्यांनी ‘रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ भारत इन द ग्लोबल वर्ल्ड : द रोल ऑफ ओवरसिज इंडियन्स’ या विषयाअंतर्गत उपस्थिताना संबोधित केले.
उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, “आज विश्वात अध्यात्मिक नेतृत्व (स्पिरिच्युअल लीडरशीप) विषयी असलेल्या दायित्वाचा प्रसार झाला, तर विश्वशांती संभव आहे. त्यादृष्टीने समाजाने तयार होण्याची गरज आहे. एकात्मतेच्या दृष्टीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे आपल्याला जगायचे आहे तसा टेक्नॉलॉजी चॉईस आपला असेल तर त्याचा मार्केटवरही परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर सहमतीने एक निर्णय घेण्याची प्रक्रिया उपयोगी आहे. भारतातून परदेशात जाणाऱ्या लोकांना याची जाण असेल तर ते विश्वातील इतर जनतेमध्ये याबाबत जनजागृती करू शकतील.”
महाकुंभविषयी बोलताना ते म्हणाले, “महाकुंभ म्हणजे केवळ स्नान नव्हे, ते भारताच्या संघटन शक्तीचे प्रतिक आहे. यातून साऱ्या जगाला संदेश गेला की आहे ‘भारत एक है’. एकतेचे सूत्र आजही तेवढ्याच प्रखरतेने जीवित आहे. विदेशातील मुलं भारतातून विदेशात गेलेल्या मुलांसोबत महाकुंभाविषयी, भारतीय संस्कृतीविषयी विचारपूस करू लागलेत.”
विश्व अध्ययन केंद्रचे अध्यक्ष अजय गजारिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर आभार प्रदर्शन विश्व अध्ययन केंद्रचे महासचिव ज्ञानेंद्र मिश्र यांनी केले.