Maharashtra assembly election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रत्येक पक्षातर्फे निवडणूक रणनीती आखली जात आहे. अश्यात महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे. भेट घेतल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री हे मुंबईत परतले आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही दिल्लीत आहेत. शहा यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा पर्यंत झालेल्या बैठकीत जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली.
याबाबत सूत्रांकडून मिळविलेल्या माहितीनुसार, महायुतीमधील जागावाटप जवळपास निश्चित झाली आहे. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप 151जागा, शिंदे यांची शिवसेना 84 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 53 जागा सोडण्यात आल्या आहे. दरम्यान काही जागांचा प्रश्न अमित शहांच्या सूचनेनंतर राज्य पातळीवर सोडवला जाईल. याशिवाय भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही जागांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागावाटपाबाबत महायुतीकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
मुंबईत अजितपवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता
जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यानुसार मुंबईत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. यात अणुशक्ती नगर, वांद्रे पूर्व आणि शिवाजी मानखुर्द या जागांचा समावेश असू शकतो. मुंबईत 36 जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित आहे. त्यानुसार भाजपला 18 जागा, शिवसेना शिंदे गटाला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 3 जागा मिळू शकतात.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला निवडणुका आहेत. एकाच टप्प्यात सर्व 288 जागांवर मतदान होणार आहे. 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरायला सुरवात होणार आहे. 29ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.