Jalgaon News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी आज ४ नोव्हेंबर रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातून एकूण सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यानुसार निवडणुकीच्या रिंगणात आता ११ उमेदवार आहेत.
जळगाव ग्रामीण मतदार संघ
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून एकूण १७ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापैकी अनिता सुनील सोनवणे, निलेश सुरेश चौधरी, रियाज सादिक देशमुख, प्रतापराव गुलाबराव पाटील, योगेश एकनाथ कोळी, मुकेश मूलचंद कोळी या ६ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
त्यामुळे आता रिंगणात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून गुलाबराव देवकर, मनसेचे मुकुंदा आनंदा रोटे, हिंदुस्थान जनता पार्टीचे किशोर मधुकर झोपे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण जगन सपकाळे, तर अपक्ष म्हणून गुलाबराव रघुनाथ पाटील, प्रसाद लीलाधर तायडे, भगवान दामोदर सोनवणे, भरत देवचंद पाटील, शिवाजी महाराज हटकर आणि सोनी संतोष नेटके अशा ११ जण निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.
गुलाबराव विरुद्ध गुलाबराव लढतीकडे लक्ष
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील निवडणुकीकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघातून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांना या निवडणुकीत आव्हान देण्यासाठी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. या मतदारसंघाचा विचार केल्यास गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. या ठिकाणी विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील हे निवडून आले आहे. तर २००९ मध्ये गुलाबराव पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी शह दिला होता. आता पुन्हा हे दोघेही उमेदवार आमने सामने असून कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.